मुंबई : एकीकडे लस घेण्याबाबत उत्सुकता आणि उत्साह तर दुसरीकडे भीती अशा संमिश्र प्रतिसादात मुंबईत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली. अ‍ॅपचा गोंधळ, लाभाथ्र्याना कळविण्यास झालेला उशीर यामुळे मुंबईत शनिवारी ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून सर्व केंद्रांवर लसीकरणाची लगबग सुरू होती. कूपरमध्ये लस घेऊन अधिष्ठाता आणि डॉक्टर केंद्रावर दाखल झाले. पंतप्रधानांनी दृकश्राव्य माध्यमातून लसीकरणाचे उद्घाटन केल्यावर कूपरमध्ये सकाळी ११च्या सुमारास माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना पहिली लस देण्यात आली.

वरिष्ठ डॉक्टरांनी स्वत: लस घेऊन कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. तर आरोग्य कर्मचारीही एकमेकांना गुलाबाचे फुल देऊन प्रोत्साहित करत होते. एकमेकांना आलिंगन देणे, हस्तांदोलन करणे, नऊ महिन्याच्या आठवणींना उजाळा देणे असा काहीसा भावनिक क्षण अनुभवास आला.

केईएममध्ये दीपप्रज्वलन आणि तीळगुळाचे वाटप करत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर यांना प्रथम लस दिली गेली. लसीकरण कक्षात आणि कक्षाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता.

बीकेसी केंद्रावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. येथे १५ कक्षांमध्ये एकेक करून लाभाथ्र्यांना पाठविले जात होते. लाभाथ्र्यांमध्ये बहुतांश आरोग्यसेविकांचा समावेश असून काही डॉक्टर आणि सफाई कर्मचारी होते. काही जणांमध्ये भीती होती तर काही जण लस घ्यायलाच हवी असा निश्चाय करून आले होते. या केंद्रावर लस घेतल्यानंतर सहा जणांना मळमळ, थकवा जाणवल्याने देखरेखीखाली ठेवले होते, तर एका आरोग्यसेविकेचा रक्तदाब स्थिर होत नसल्याने लो. टिळक रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. एका महिलेला अ‍ॅलर्जी रिअ‍ॅक्शन आल्याने देखरेखीखाली ठेवले होते.

राज्यात उद्दिष्टाच्या ६४ टक्के लसीकरण

राज्यात पहिल्याच दिवशी सुमारे ६४ टक्के करोना लसीकरण झाले. राज्यभरात २८५ केंद्रांवर शनिवारी सायंकाळी सातपर्यंत सुमारे १८ हजार ३३८ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

तज्ज्ञ डॉक्टरांचा पुढाकार 

राज्याच्या करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी, राहुल पंडित, बॉम्बे रुग्णालयाचे डॉ.गौतम भन्साली, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी बीकेसीमध्ये स्वत: लस टोचून घेतली. काही डॉक्टरांनीही या लशीबाबत आक्षेप व्यक्त केल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून संसर्ग प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे असल्याचा संदेश या डॉक्टरांनी आपल्या कृतीतून यावेळी दिला.

ठाणे जिल्ह्यात मोहिमेला सुरुवात

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भागांसह ग्रामीण भागात  करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. एकूण २९ केंद्रांवर लस देण्यात आली.

धसक्याने तब्येत बिघडली

बदलापूर शहरात लसीकरणादरम्यान एका २५ वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लसीकरणाचा धसका घेतल्याने तब्येत बिघडल्याची माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली. या कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘पहिल्या दिवशी पहिली लस आपण घेणार आहोत याबद्दल उत्सुकता होती. अफवांवर विश्वाास ठेवण्यापेक्षा आपण स्वत: त्याचा अनुभव घेतला तर नक्कीच आनंद मिळेल.        – डॉ. निनाद गायकवाड,     कूपर रुग्णालय 

बाधित रुग्णांचे एक्स रे काढताना त्यांची अवस्था, कुटुंबीयांची अवस्था मी पाहिली आहे. त्यामुळे आज लस घेताना काहीतरी चांगली सुरुवात होईल असे वाटते. – सुनील आडेलकर, क्ष किरण विभागातील कर्मचारी, कूपर रुग्णालय

त्रास झाला तर काय काळजी घ्यायची, कशी यंत्रणा राबवायची, कोणते उपाय करायचे याचे मार्गदर्शन मी माझ्या समूहाला केले आहे. त्यामुळे लस घेताना माझ्या मनात भीती नव्हती.   – डॉ. नैना दळवी. भूलतज्ज्ञ    प्राध्यापिका, कूपर रुग्णालय

लसीकरण झाल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही. आता २७ दिवसांनी पुन्हा दुसरी लस घेण्यासाठी येईल. – दीपक सावंत, माजी आरोग्यमंत्री

करोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी नव्या विषाणूपासून बचाव होण्यासाठी या लशीची मदत होईल. त्यामुळे न घाबरता ही लस टोचून घ्यावी हेच सांगण्यासाठी मी लस घेतली आहे.  – डॉ. मिलिंद नाडकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रमुख,       केईएम रुग्णालय

मला जून महिन्यात करोनाची लागण झाली होती, त्यातून पूर्णपणे बरी झाली आहे. परंतु तरीही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी  लस घेणे गरजेचे आहे – डॉ. ऋतुजा प्रधान, वाडिया रुग्णालय

माझ्या या सेवेची दखल घेत पहिला लाभार्थी होण्याची संधी दिली त्याबद्दल मी अभिमानी आहे. –  डॉ. मनोज पाचंगे, बीकेसी रुग्णालय

आहारतज्ज्ञ म्हणून चार महिने करोना रुग्णांसोबत काम करत आहे. रुग्णालयाच्या पाठिंब्यामुळेच लस घेण्याचे पाऊल टाकले  –  डॉ. मधुरा पाटील, बीकेसी   रुग्णालय

 

अ‍ॅप सुरू नसल्याने यंत्रणांची धावपळ

करोना लसीकरणासाठी केंद्राने उपलब्ध केलेले ‘को-विन’ अ‍ॅप शुक्रवार रात्रीपासून चालत नसल्याने पालिकेच्या यंत्रणांचा मुंबईत गोंधळ उडाला. अखेर लाभार्थ्यांना फोन करून बोलाविण्याची वेळ पालिकेवर आली. त्यामुळे शनिवारी अ‍ॅपचा वापर न करता लसीकरण सुरू करावे लागले.