ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेल्या लशीचा मुंबईतही प्रयोग

मुंबई : केईएम आणि नायर ही पालिकेची प्रमुख रुग्णालये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या करोना लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी वैद्यकीय चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव नैतिक समितीकडे रुग्णालय प्रशासनाने पाठविला असून ऑगस्टच्या  अखेपर्यंत या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणेस्थित सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या जगातील सर्वाधिक लस उत्पादन कंपनीला ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्रझेनेकाने विकसित केलेल्या लशीच्या मानवी वैद्यकीय चाचण्या करण्याची परवानगी दिलेली आहे. या चाचण्यांमध्ये केईएम आणि नायर रुग्णालयांना सहभागी होण्याची परवानगी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिली आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

वैद्यकीय चाचण्या कशा कराव्यात, लस देण्यासाठी काय निकष असावेत, याचा सविस्तर प्रस्ताव नैतिक समितीला पाठविला आहे. हे निकष योग्य आहेत का, चाचण्या करताना संभाव्य धोके लक्षात घेऊन योग्य काळजी घेतली आहे का, मानवी हक्काची पायमल्ली होणार नाही याचा विचार केला आहे. या मुद्दय़ावर ही समिती प्रस्तावाचा अभ्यास करेल आणि मंजुरी देईल. ऑगस्टच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चाचण्या सुरू होतील, अशी माहिती केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

नायरमध्ये ही समिती या प्रस्तावाचा अभ्यास करत असल्याचे नायरचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. नैतिक समितीमध्ये रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांसह प्रशासकीय अधिकारी, रुग्णायाबाहेरील तज्ज्ञ यांचा समावेश आहे. तसेच चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीची संमती नोंदविणे, लस दिल्यानंतर काही परिणाम आढळल्यास त्याच्या नोंदी करणे आणि लस देण्यासाठीच्या नियमावलीचे पालन योग्य रीतीने केले जात आहे का याची देखरेख करणे यासाठी रुग्णालयाव्यतिरिक्त काही व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लशीचे देशभरातील १० ठिकाणी वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार असून प्रत्येक ठिकाणी १६० व्यक्ती या चाचणीत सहभागी होणार आहेत.