News Flash

केईएम रुग्णालयात झाली करोना लशीची चाचणी, आणखी १६० जणांची चाचणी होणार

ज्या स्वयंसेवकांची चाचणी होणार आहे त्यांची नावं ठेवली जाणार गुप्त

संदीप आचार्य
मुंबई: संपूर्ण जगात करोनाने धुमाकूळ घातला असून करोनावरील लसी साठी जगभरात संशोधन सुरु आहे. महापालिकेच्या केईएम रुग्णालयात आज शनिवारी तिघा स्वयंसेवकांना करोनाची लस टोचण्यात आली. सिरम व ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ने ही लस विकसित केली असून संपूर्ण भारतात निवडक दहा केंद्रात १६०० स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग केला जाणार आहे.

केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी तिघा स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली असून दुपारपर्यंत या तिघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. सिरम- ऑक्सफर्ड संस्थेने चाचणीचे पहिले दोन टप्पे पार केल्यानंतर मानवी चाचणीसाठी त्यांना ‘आयसीएमआर’ ने परवानगी दिली. या अंतर्गत करोना झालेला नसलेली व्यक्ती जीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आहे तसेच शरीरात अॅन्टिबॉडीज तयार झालेल्या नाहीत. अन्य कोणते आजार तसेच कोमॉर्बीड नसलेली सशक्त व्यक्तीच अशा चाचणीसाठी पात्र ठरत असून कईएममधील ‘कोव्हीशिल्ड’ चाचणीची घोषणा केली तेव्हा तात्काळ ३५० लोकांनी या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून आपली नावे नोंदविल्याचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

यापैकी १६० सुदृढ लोकांचीच चाचणी केली जाणार असून या चाचणीसाठी केईएमच्या एथिक्स समितीची मान्यता घेण्यात आली आहे. एथिक्स समितीने काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यात चाचणी दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यास अथवा आजारी पडल्यास त्याला विमा संरक्षण म्हणजेच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. समितीच्या सर्व आक्षेपांची पूर्तता करण्यात आली असून चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास एक कोटी रुपये भरपाई विम्याच्या माध्यमातून मिळेल तसेच आजारी पडल्यास ३८ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण असणार आहे. शनिवारी तिघा स्वयंसेवकांना लस देण्यात आल्यानंतर आणखी दहा जणांची फिटनेस चाचणी करण्यात आली आहे.

ज्या तिघांना लस देण्यात आली त्यांच्यावर नियमितपणे डॉक्टर लक्ष ठेवून राहाणार आहेत. तसेच या तिघांना २९ व्या दिवशी दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर तीन व सहा महिन्यांनी त्यांच्यावरील परिणामांचा आढावा घेतला जाणार आहे. केईएममध्ये १६० स्वयंसेवकांवर चाचणी करण्याची परवानगी मिळाली असली तरी पहिल्या टप्प्यात १०० जणांवरच चाचणी केली जाणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. चाचणी केलेल्या सर्वांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशभरातील दहा केंद्रांमधून १६०० लोकांची चाचणी केली जाणार असून त्यातून लशीची उपयुक्तता सिद्ध होणार आहे. संपूण जगात तिसऱ्या टप्प्यात सुमारे ८० कंपन्या पोहोचल्या असून वेगवेगळ्या देशात सध्या करोना लशीची मानवी चाचणी सुरु असल्याचे केईएममधील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 3:56 pm

Web Title: corona vaccine was tested on three people at kem hospital and another 160 people will be tested scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री सारा अली खानची होणार चौकशी; एनसीबी कार्यालयात दाखल
2 दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल
3 “बिहारमधील निवडणुकीचे मुद्दे संपले असतील तर मुंबईतून…,” संजय राऊतांचा टोला
Just Now!
X