मुंबई  : महापालिका आणि राज्य सरकारतर्फे चालवली जाणारी लसीकरण केंद्रे आठवडाभरापूर्वी लशींच्या तुटवड्यामुळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्याच वेळी खासगी रुग्णालयांत लशींच्या लाखो मात्रा उपलब्ध होत्या, अशी माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारच्या कोट्यातून महाराष्ट्राने करोना प्रतिबंधक लशींच्या २५.१० लाख मात्रा खरेदी केल्या; तर खासगी रुग्णालयांनी ३२.३८ लाख मात्रांची खरेदी केली. हे कोणत्याही राज्यातील सर्वाधिक प्रमाण आहे. मुंबईत तर ही तफावत आणखी वाढून, खासगी रुग्णालयांनी लशींच्या २३.३७ लाख, म्हणजे राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिलेल्या ५.२३ लाख मात्रांच्या चौपट मात्रा खरेदी केल्या.

एप्रिल महिन्यात खासगी रुग्णालयांना लस उत्पादकांकडून थेट खरेदी करता येत नसताना महापालिकेला यापेक्षा मोठ्या प्रमाणात- ९.४७ लाख मात्रा राज्य सरकारकडून मिळाल्या होत्या.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईत खासगी रुग्णालयांनी १ मे पासून २ जूनपर्यंत केवळ ३.३४ लाख लसमात्रा दिल्या. याचाच अर्थ, ही रुग्णालये त्यांच्या साठ्यापैकी केवळ १५ टक्के मात्रांचा वापर करू शकली. हे प्रमाण राष्ट्रीय स्तरावरील १७ टक्क््यांच्या सरासरी वापरापेक्षा कमी आहे. देशभरातील खासगी रुग्णालयांनी मिळून मे महिन्यात लशींच्या १.२९ कोटी मात्रा खरेदी केल्या आणि त्यापैकी केवळ २२ लाख मात्रा दिल्या, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच सांगितले होते. मात्र मुंबईतील आकडेवारी काहीशी दिशाभूल करणारी ठरू शकते. ९.८९ लाख मात्रा (मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांनी खरेदी केलेल्या मात्रांच्या जवळपास ४४ टक्के) खरेदी केलेल्या सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने केवळ मुंबईतच नव्हे, तर देशभरातील शहरांतील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले. कंपनीने दर दिवशी १० ते १५ हजार मात्रा दिल्याचे या रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. हे गृहीत धरल्यास मे महिन्यात हे प्रमाण सुमारे ४.६५ लाख होते. इतर काही रुग्णालयांनीही ठाणे व नवी मुंबईत लसीकरण मोहीम राबवली. या दोन शहरांमध्ये मे महिन्यात देण्यात आलेल्या मात्रांची एकूण संख्या १.३४ लाख होती.