31 May 2020

News Flash

‘करोना’मुळे चिनी वस्तू महाग

इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल बाजारात चिनी वस्तूंच्या किमतीमध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

|| अमर शैला सदाशिव

आयातीवर बंधने आल्याने बाजारपेठेत कमी पुरवठा

मुंबई : कमी किंमत, वैविध्य आणि मुबलक पुरवठा यांमुळे भारतातील खेळण्यांपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत अनेक वस्तूंच्या बाजारपेठेत वर्चस्व निर्माण करणाऱ्या चिनी वस्तूंनाही ‘करोना’ची बाधा झाली आहे. ‘करोना’ विषाणूच्या प्रभावामुळे चिनी मालाच्या आयातीवर बंधने आल्याने या वस्तूंची आवक घटली आहे. याचा परिणाम चिनी वस्तूंचे दर महागण्यात झाला आहे.

इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल बाजारात चिनी वस्तूंच्या किमतीमध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनमधून माल कधीपर्यंत येईल याची शाश्वती नसल्याने व्यापाऱ्यांनी साठविलेला माल अधिक दराने विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिस्थिती निवळली नाही तर, येत्या काळात चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मोबाइल फोनपासून ते घरातील विजेचे दिवे, विविध प्रकारचे स्वीच, विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, त्याचबरोबर सेमी कंडक्टर, मदरबोर्ड यांची चीनमधून आयात केली जाते. भारतीय बाजारपेठ आणि इतर देशांच्या तुलनेत या वस्तू चीनमधील बाजारातून स्वस्तात मिळतात. त्यामुळे या वस्तूंची चीनमधून मोठय़ा प्रमाणात आयात केली जाते. मुंबईतील बाजारपेठेत येणारा सुमारे ६० टक्के माल एकटय़ा चीनमधून येतो. आयात मालातील मोठा साठा मुंबईत येतो. येथून पुढे राज्यभरात आणि देशातील कानाकोपऱ्यात माल पाठविला जातो. मात्र करोना विषाणूच्या प्रभावामुळे चिनी बाजारपेठ मागील महिनाभरापासून बंद आहे. परिणामी मागील महिनाभरापासून तेथून येणारे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचा माल ही जवळपास बंद झाला आहे. परिणामी या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून व्यापाऱ्यांकडील साठय़ात घट होत आहे, तर काही वस्तूंचा साठा संपला आहे.

अर्थात पुढील १५ दिवसांमध्ये बाजारपेठेत वस्तूंची टंचाई दिसण्यास सुरवात होईल. त्यामुळे या वस्तूंच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

नवा माल एप्रिलनंतरच

घाऊक विक्रेत्यांनी चिनी नवीन वर्षांमुळे दोन महिन्यांपूर्वीच या वस्तूंचा साठा करून ठेवला होता. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये तेथील बाजारपेठ सुरू झाल्यावर मालाची मागणी केली जाणार होती. मात्र चिनी बाजारपेठ बंद असल्याने आता मालाची मागणी करणे येथील व्यापाऱ्यांना शक्य नाही. तसेच याआधी १३ फेब्रुवारीला चिनी बाजारपेठ खुली होणार होती. मात्र आता मार्चच्या पहिल्या आठवडय़ात बाजारपेठ खुली होईल. त्यामुळे मार्चमध्ये मालाची मागणी केल्यास तो भारतात येण्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जाईल.

अनेक कंपन्या चीनमधून सुट्टे भाग भारतात आणून त्याची जुळणी करून वस्तूंची निर्मिती करतात. सध्या आयात ठप्प झाली असल्याने हे सुट्टे भाग मिळणेही बंद झाले आहे. त्यामुळे येत्या काळात ६० ते ७० टक्के व्यवसाय प्रभावित होईल.

– ऋषभ शहा, ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:17 am

Web Title: corona virus china goods expensive akp 94
Next Stories
1 पालिका आयुक्तांना न्यायालयाची तंबी
2 ४७ वातानुकूलित लोकलची बांधणी लांबणीवर
3 राज्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांची पायपीट!
Just Now!
X