करोनामुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

मुंबई-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज, गुरुवारपासून  सुरू  होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना करोनामुळे परीक्षेस उपस्थित राहता येणार नाही, त्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व धोक्यामुळे शालेयस्तरापासून ते महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरावरील परीक्षांबाबत अनिश्चिातता निर्माण झाली. त्यातही वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिन्याभरापूर्वीच परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन या परीक्षा सुरु होत आहेत.

निर्णय काय?

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी २०२० लेखी परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना करोना झाला असल्याचे आढळेल, ते परीक्षेस अनुपस्थित राहतील. मात्र  लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर, त्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात येईल. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.

अडचणी येऊ नयेत म्हणून…

करोनाच्या पाश्र्वाभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत.  विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वत:ची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकतात.