पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन

मुंबई : करोनाचे संकट निवळल्यावर होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळविण्याचे उद्या, गुरुवारी २२वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य आहे.

करोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे. पक्षाच्या वतीने विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असले तरी करोनाविषयक नियमांचे पालन करूनच ते पार पाडले जातील. दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. सत्तेत आल्यावर राष्ट्रवादीने पक्ष वाढीवर भर दिला. पुणे पदवीधर मतदारसंघातील विजय आणि सांगली महापौरपद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवाने मात्र राष्ट्रवादीला धक्का बसला.

या वर्षअखेर तसेच पुढील वर्षाच्या सुरुवातीला १५ महानगरपालिका, २००पेक्षा जास्त नगरपालिका वा नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. करोनाचे संकट कमी झाल्यावरच या निवडणुका होतील. सत्तेत असताना यापूर्वी २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस चांगले यश संपादन करील, असा विश्वाास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त के ला.

पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर या महापालिकांमध्ये राष्ट्रवादीला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यामध्ये वर्चस्व कायम राखण्याची पक्षाची योजना आहे. शहरी भागात राष्ट्रवादीला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी निमशहरी आणि ग्रामीण भागात मात्र चांगली कामगिरी करून पक्षाचा पाया भक्कम करण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसने एकत्र लढाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. या दृष्टीने मतैक्य व्हावे म्हणून प्रयत्नही सुरू झाले आहेत. काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार वेगळे लढण्याची घटक पक्ष भूमिका घेऊ शकतात. महाविकास आघाडीच या निवडणुकांमध्ये सर्वाधिक यश मिळवेल. – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस