टंकलेखनाची परीक्षा दिली नसल्याचे कारण

मुंबई : करोनाशी संबंधित कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसाला नोकरी देण्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केलेले असले तरी इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र नाही यामुळे नोकरी नाकारली जात आहे. टंकलेखनाचे प्रमाणपत्र देण्याची जुनी अट बदलण्याची गरज असताना पालिका मात्र जुन्या नियमावर बोट ठेवत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

पालिके च्या आरोग्य विभागातील कर्मचारी करोनाबाधित झाले आहेत. डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्याबरोबरच अधिकारी, अभियंते, विविध विभागातील कर्मचारी, शिपाई यांनादेखील करोनाशी संबंधित कामे देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात विविध विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत, तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आतापर्यंत २०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पालिके ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ५० लाख रुपयांची सानुग्रह अनुदान योजना  जाहीर के ली आहे. तसेच करोनाशी संबंधित कर्तव्य बजावताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शिक्षणानुसार पालिके त नोकरीही दिली जात आहे. मात्र ही नोकरी देत असताना ज्यांच्याकडे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रमाणपत्र नाही त्यांना नोकरी नाकारण्यात आली आहे. अशा किमान ४० उमेदवारांना नोकरी नाकारल्याचा आरोप कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी के ला आहे.

टंकलेखनाचे यंत्र या काळात बाद झाले आहे, तर टंकलेखनाची परीक्षा आणि त्याच्या वेगाचे प्रमाणपत्र देण्याची पद्धतही सरकारने बंद के ली आहे. काही वारसदारांनी संगणकाचे प्रशिक्षण घेतले आहे. मात्र पालिका आपल्या जुन्याच नियमावर अडून बसली असल्याचा आरोप देवदास यांनी के ला आहे. काळाबरोबर हा नियम बदलण्याची मागणी त्यांनी के ली आहे. दरम्यान, याबाबत सामान्य प्रशासन विभागाची बाजू समजून घेण्यासाठी प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.