आज सकाळपासून लोकल आणि बस सेवा बंद होणार अशी जोरदार चर्चा होती. विविध वृत्तवाहिन्या सूत्रांच्या हवाल्याने लोकल आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो अशा बातम्या देत होत्या. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी माध्यमांना सामोरे जाताना लोकल आणि बस सेवा बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही असे स्पष्ट केले. लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. अनावश्यक प्रवास करु नये, गर्दी टाळावी असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही लोकल आणि बस सेवा बंद करण्याविषयी सविस्तर चर्चा केली. पण आम्ही हा निर्णय घेतला नाही. मुंबईत अनेकांचे हातावर पोट आहे. त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळेच लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही” असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

सरकारी कार्यालयात कमीत कमी उपस्थितीत काम कसे होईल, शक्य तितकी गर्दी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत असे टोपे म्हणाले.