News Flash

गरजेएवढय़ाच कामगारांना कामावर बोलवा

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमी वर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत संवाद साधला.

संग्रहित

मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन, सरकारशी सहकार्याची ग्वाही

मुंबई : मुंबईतील करोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्योगजगताने काही कालावधीसाठी कारखान्यांमध्ये आवश्यकतेनुसारच कामगारांना कामावर बोलवावे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, घरातूनच काम (वर्क फ्रॉम होम) करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार करोनाबाधित होईल त्या कामगाराच्या कुटुंबाची जबाबदारी उद्योगांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उद्योगांना के ले. त्यावर सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही उद्योगजगताने दिली.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमी वर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत संवाद साधला. अनर्थ रोखायचा तर अर्थचक्र बाधित होते आणि अर्थचक्र सुरू ठेवायचे तर अनर्थ होतो, या कात्रीत आपण सापडलो असून या संकटकाळात मित्र होऊन सोबत राहणे महत्त्वाचे असते. राज्यातील उद्योगजगताने नेहमीच मित्रत्वाच्या भावनेने शासनास आतापर्यंत मदत केली आहे, सहकार्य केले आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जिंदाल उद्योग समूहाने पुढे येऊन ऑक्सिजनच्या पुरवठय़ासाठी शासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. बाबा कल्याणी यांनी व्हेंटिलेटर्सची निर्मितीच नाही तर ते वापरण्याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचारी आणि तंत्रज्ञांना देण्याची तयारीही दाखवली आहे. ही मदत अमूल्य आहे. काही उद्योजकांनी त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेण्याचीही तयारी दाखवली आहे. आपण सगळ्यांचे लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहोत अशी माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना उद्योगजगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योगजगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यांनी आठवडय़ाचे सातही दिवस आणि २४ तास लसीकरण व्हावे, करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे, र्निबधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा, शिस्तबद्ध वर्तणूक राहील यासाठी कडक नियमावली तयार करावी, लोकांचा रोजगार सुरू राहील हे पाहावे, जिथे शक्य आहे तिथे घरून काम करण्याच्या सूचना द्याव्यात, अशा विविध अपेक्षा या वेळी उद्योजकांनी व्यक्त के ल्या. बाबा कल्याणी, उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, हर्ष गोयंका, निखिल मेसवानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपूर्व भट्टाचार्य, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे, आनंद गांधी, सिद्धार्थ जैन आदी उद्योजक सहभागी झाले होते.

चित्रपट, मालिका निर्मात्यांशी चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमी वर चित्रपट व टीव्ही मालिका निर्माते यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा करून शासन लागू करीत असलेल्या र्निबधांबाबत सहकार्य करावे, असे आवाहन केले. निर्मात्यांनी आपल्या विविध सूचना मांडून शासन घेईल, त्या निर्णयांना एकजुटीने पाठिंबा असेल, असे आश्वासन दिले. या बैठकीत महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, मनोज जोशी, सुबोध भावे, डॉ. अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी. पी. अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर आदी सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:53 am

Web Title: corona virus infection call in as many workers as you need akp 94
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन
2 शिक्षण हक्क कायद्यानुसार राखीव जागांसाठी दुपटीपेक्षा अधिक अर्ज
3 Coronavirus : मुंबईत ११ हजार १६३ करोनाबाधित वाढले, २५ रूग्णांचा मृत्यू
Just Now!
X