करोना प्रादुर्भावाचा फटका

मुंबई : मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयांना करोना प्रादुर्भावाचा फटका बसल्याचे दिसत असून यंदा शहर आणि उपनगरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश घटले आहेत.

यंदा बारावीचा निकाल घसघशीत लागल्यामुळे प्रत्यक्षात प्रथम वर्षाच्या प्रवेशात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात यंदा मुंबई आणि उपनगरांतील महाविद्यालयांतील प्रवेश घटल्याचे दिसत आहेत. विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी गेल्या वर्षी (२०१९-२०) मुंबई शहरातील महाविद्यालयांमध्ये ६५ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा (२०२०-२१) मात्र ५२ हजार ६७३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचे दिसत आहे. उपनगरांतील महाविद्यालयांमध्येही प्रवेश घटले आहेत. गेल्यावर्षी उपनगरांतील महाविद्यालयांमध्ये ५१ हजार ७२२ प्रवेश झाले होते तर यंदा ४४ हजार ३६८ प्रवेश झाले आहेत. अधिसभा सदस्य आरती प्रसाद यांनी विचारलेल्या प्रश्नाला विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे.

प्रवेशात घट का?

करोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे शुल्क भरण्यापासून अनेक अडचणींना कुटुंबांना तोंड द्यावे लगत आहे. त्याचा परिणामही प्रवेशावर झाला असल्याचे निरीक्षण प्राचार्यांनी नोंदवले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागांतून आणि परराज्यातून मुंबईत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे प्रवेशात घट दिसत आहे. ‘आर्थिक कारण हे प्रवेश कमी होण्यामागील प्रमुख कारण आहे. प्रामुख्याने विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्रवेशांत अधिक घट असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अजून वसतिगृहे सुरू झालेली नाहीत, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. अपंग विद्यार्थ्यांनाही प्रवेश, निवास अशा सुविधा पुरेशा मिळू शकल्या नाहीत तर हे विद्यार्थीही प्रवाहाबाहेर जाऊ शकतात,’ असे मत अभ्यासक आनंद मापुसकर यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन शिक्षणाचे पर्याय

ऑनलाइन शिक्षणाचेही पर्याय वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल ऑनलाइन किंवा दूरशिक्षणाच्या माध्यमातून शिकण्याकडेही वाढला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक विद्यापीठांना खासगी विद्यापीठांची मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. आकर्षक, नवख्या नामाभिधानाच्या पदव्या ही विद्यापीठे देतात. त्यामुळे विद्यार्थी तेथेही प्रवेश घेत आहेत,’ असेही एका प्राचार्यांनी सांगितले.

कोकणातील प्रवेशही घटले

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हेही मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात येतात. या जिल्ह्यांतील महाविद्यालयेही मुंबई विद्यापीठाशी संलग्न असली तरी येथील विद्यार्थ्यांचा कल उच्च शिक्षणासाठी मुंबईत येण्याकडे असतो. या जिल्ह्यातील महाविद्यालयांतील प्रवेशही कमी झाले आहेत.