मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरताच बेस्टमध्येही सापडणाऱ्या करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या तीन दिवसांत एकही कर्मचारी करोनाबाधित म्हणून आढळला नसल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. दरम्यान, आतापर्यंत ९५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

करोनाच्या सुरुवातीच्या काळापासून मुंबई व महानगरात बेस्ट उपक्रमातील बसगाड्या या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.  कर्तव्य बजावताना काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. आतापर्यंत कर्तव्यावर असताना ३ हजार ४७४ कर्मचारी करोनाबाधित झाले. त्यातील ३ हजार ३५० कर्मचारी बरे झाले. आता उपचार सुरू असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ११ आहे. यातील दोन जण प्राणवायू तर एक जण जीवरक्षक प्रणालीवर आहे. आतापर्यंत ९५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.  बेस्ट उपक्रमाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या पहिल्या लाटेत २,९०० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली होती. हीच संख्या दुसऱ्या लाटेत कमी झाली आहे. ५७४ जणांना दुसऱ्या लाटेत लागण झाली.   कर्तव्यावर असताना ९५ कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर कर्तव्यावर नसताना १६ कर्मचारी करोनामुळे दगावले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मात्र आर्थिक अनुदानाचा नियम लागू होत नसल्याने त्यांचे वारस यापासून वंचित राहिले आहेत.