अतिदक्षता विभागातही २० टक्केच शिल्लक

मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे करोना रुग्णांसाठी असलेल्या जेमतेम २० टक्केच रुग्णशय्या उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. खाटांची संख्या २१ हजारापर्यंत वाढवण्याचे पालिकेचे प्रयत्न असले तरी वाढवेल्या खाटाही लगेचच भरत आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाच हजारांच्यापुढे रुग्ण आढळत आहेत, तर गेल्या दोन दिवसांपासून ही संख्या आठ हजारांच्यापुढे गेली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होते आहे. सध्या मुंबईत ५८ हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यापैकी सुमारे १० हजारांहून अधिक रुग्णांना लक्षणे आहेत, तर गंभीर रुग्णांची संख्याही वाढत असून सध्या ८९९ रुग्ण गंभीर आहे.

आधीच उपचाराधीन रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचा कालावधी संपण्यापूर्वीच दररोज हजारोंनी नवीन रुग्णांची भर पडते आहे. त्यामुळे आता रुग्णशय्या कमी पडू लागल्या आहेत. यामध्ये सर्वसामान्य खाटा, संशयित रुग्णांसाठी विलगीकरण, ज्यांची घरे लहान आहेत अशा बाधितांसाठी अलगीकरण, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खाटा, अतिदक्षता विभागाच्या खाटा, ऑक्सिजनसह किंवा कृत्रिम श्वसन उपकरणांसह असलेल्या खाटा यांचा समावेश आहे.

सर्वसामान्य खाटांबरोबरच अतिदक्षता विभागातील खाटादेखील आम्ही वाढवत आहेत. पालिकेची रुग्णालये, सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये येथील रुग्णशय्यादेखील टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नियंत्रण कक्षामार्फतच

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांपर्यंत जाण्याची शक्यताही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्तकेली होती. मात्र सद्य:स्थितीत ७० टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांपर्यंत वाढली तरी ज्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, अशा रुग्णांची संख्या कमी असेल. या संख्येप्रमाणे खाटांची व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. काही रुग्ण परस्पर प्रयोगशाळेतून चाचणीचा अहवाल मिळवून खासगी रुग्णालयात रुग्णशय्या मिळवत असल्यामुळे रुग्णशय्यांचे व्यवस्थापन बिघडते आहे. त्यामुळे रुग्णशय्या नियंत्रण कक्षामार्फतच उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशा सूचना आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या आहेत.

‘संख्या वाढवण्याचे प्रयत्न’

रुग्ण वाढत असल्यामुळे आम्ही रोज टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढवत आहोत. रुग्णशय्या २१ हजारांपर्यंत वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. गेल्या आठवडय़ात १३ हजारांपर्यंत असलेली रुग्णशय्यांची संख्या आता १७ हजारांपर्यंत नेण्यात पालिकेला यश आले आहे, अशी प्रतिक्रिया अतिरिक्तआयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.