|| शैलजा तिवले

रुग्णालय, दवाखान्यांच्या कामांना विलंब

मुंबई: करोनाकाळात रुग्णालये, दवाखान्यांची दुरुस्ती आणि पुनर्विकासासाठी कामे रखडल्याने गेल्या वर्षी आरोग्याच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या भांडवली खर्चातील सुमारे २५ टक्के निधी विनावापर पडून राहिला आहे. तरी या वर्षी भांडवली खर्चासाठी १२०६ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

रुग्णालयांची दुरुस्ती आणि पुनर्विकास यासाठी २०१४ पासून कोट्यवधी रुपयांची तरतूद पालिकेच्या अर्थसंकल्पात केली जात असूनही याचा वापरच होत नाही. त्यामुळे २०१७-१८ मध्ये भांडवली खर्चामध्ये पालिकेने कपात केली. त्यानंतर काही कामे मार्गी लागली असली तरी भांडवली खर्चासाठी अर्थसंकल्पामध्ये केलेली तरतूद आणि प्रत्यक्ष वापर यामध्ये अजूनही कोट्यवधी रुपयांची तफावत असल्याने रुग्णालयाच्या दुरुस्ती, पुनर्विकासाची कामे गेली अनेक वर्षे रेंगाळलेलीच राहिली. याचे परिणाम करोनाकाळात स्पष्टपणे जाणवले. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पालिकेने सुमारे ३७० कोटी रुपयांची भांडवली खर्चात वाढ करत १०४९ कोटी रुपयांची तरतूद केली होती; परंतु करोनाकाळात सर्व आरोग्य सेवा उपचार देण्यामागे लागली असल्याने दुरुस्ती आणि पुनर्विकासाची कामे गेल्या वर्षातही होऊ शकली नाहीत. त्यामुळे यातील ७८० कोटी रुपयांचा वापर झाला आहे.

याउलट महसूल खर्चात मात्र तरतुदीपेक्षा सुमारे एक हजार कोटी रुपयांनी अधिक खर्च झाल्याचे नोंदले आहे. गेल्या वर्षी महसुली खर्चासाठी ३२११ कोटी रुपयांची तरतूद केली होती; परंतु करोनाकाळात वेतन, भत्ते इत्यादी खर्चात वाढ झाल्याने प्रत्यक्षात खर्च ४४४५ कोटी रुपयांचा झाला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच आरोग्याच्या सुधारित अंदाजामध्ये तरतूद केलेल्या निधीपेक्षा सुमारे एक हजार कोटी रुपये अधिक खर्च झाल्याचे आढळले आहे. या वर्षी महसुली खर्चासाठी ३५२२ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे.

करोनाकाळात दुरुस्ती, नवी यंत्रसामग्री खरेदी यापेक्षा रुग्णसेवेसाठी आवश्यक बाबींच्या खरेदीवर अधिक भर दिला गेला. पुनर्विकासाची कामे गेल्या अनेक काळापासून रखडली असली तरी आता या वर्षी याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल. दर महिन्याला किमान एक निविदा जाहीर करत ही कामे मार्गी लावण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे येत्या वर्षात भांडवली खर्चाच्या तरतुदीतील सुमारे ९० टक्के निधीचा नक्कीच वापर केला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.