रुग्ण घटूनही महापालिकेचा सावध पवित्रा; ठाणे, पुणे मात्र नियममुक्त

मुंबई : करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि खाटांची उपलब्धता या आधारे ठाणे आणि पुण्यासह २१ जिल्ह्यांमधील निर्बंध सोमवारपासून शिथिल होणार असले तरी मुंबईत गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई महापालिकेने जोखीम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील निर्बंध कायम ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावरील बंदीही कायम राहील. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. दुकाने खुली ठेवण्याची वेळ दुपारी ४ वाजेपर्यंतच राहणार आहे.

रुग्णसंख्या, संसर्गदर आणि प्राणवायूयुक्त रिक्त खाटांचे प्रमाण या आधारे दर शुक्रवारी आढावा घेऊन निर्बंध शिथिल करण्याच्या सरकारच्या निर्णयानुसार सोमवार, १४ जूनपासून कोणत्या जिल्ह्यात कशी परिस्थिती असेल, याचे निर्देश आपत्ती निवारण विभागाने जारी केले. त्यानुसार मुंबईतील संसर्गदर कमी झाल्याने शहराचा दुसऱ्या स्तरात समावेश झाला. परंतु मुंबईची भौगौलिक रचना, अतिवृष्टीचा इशारा आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबईचा सध्याचा तिसरा स्तर महापालिके ने कायम ठेवला. परिणामी दुसऱ्या स्तरात समावेश होऊनही तिसऱ्या स्तराचे निर्बंध शहरात लागू राहणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या निकषांनुसार मुंबई शहर आणि उपनगराचा समावेश दुसऱ्या स्तरात करण्यात आला असला तरी तिसऱ्या स्तरातील निर्बंधच लागू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

 

२१ जिल्हे निर्बंधमुक्त

रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मात्र हे जिल्हे वगळता राज्याच्या बहुतांशी भागातील निर्बंध आता रद्द झाले आहेत.

रुग्णसंख्या, चाचण्यानंतर आढळणारे संसर्ग प्रमाण आणि प्राणवायूयुक्त व्याप्त खाटा याचा दर शुक्र वारी आढावा घेऊन सोमवारपासून त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानुसार सोमवार, १४ जूनपासून नवे निर्बंध लागू होतील, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर के ले. पहिल्या टप्प्यात १२ जिल्ह्यांमधील निर्बंध रद्द झाले होते. आता ही संख्या २१ झाली आहे. निर्बंध किती ठेवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. १२ महानगरपलिका आणि ३४ जिल्हे असे स्वतंत्र घटक त्यासाठी सरकारने तयार के ले आहेत.

 

पहिला स्तर

करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी प्राणवायू खाटा व्याप्त असतील अशा जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आले असून तेथील जनजीवन पूर्ववत सुरू होईल. यात अहमदनगर, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

दुसरा स्तर

करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ ते ४० टक्क्यांच्या दरम्यान प्राणवायू खाटा व्याप्त असतील अशा जिल्ह्यांमध्ये सर्व दुकाने उघडी ठेवण्यास मुभा. मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे या दोन जिल्ह्यांचा यात समावेश.

 

तिसरा स्तर

करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आणि प्राणवायूच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक खाटा रुग्णांनी व्याप्त असतील असे जिल्हे आणि महापालिकांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने पिंपरी-चिंचवड महापालिका, अकोला, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, नाशिक, उस्मानाबाद, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. मात्र ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर आणि नवी मुंबई शहर तसेच औरंगाबाद शहर स्तर दोनमध्ये असल्याने सध्या तेथील निर्बंध हटविण्यात आले आहेत. या गटातील जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील व इतर सारी दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत खुली राहतील. अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील.

 

चौथा स्तर

चौथ्या टप्प्यात साप्ताहिक बाधितांचे प्रमाण १० ते २० टक्क््यांदरम्यान आणि प्राणवायूयुक्त खाटा ६० टक्क्यांपेक्षा अधिक व्याप्त असतील, अशा जिल्ह्यांचा समावेश होतो. या टप्प्यात पुणे (पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका वगळून), रायगड, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात संचारबंदी राहील. येथे अत्यावश्यक सेवेतील दुकाने दररोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

 

पाचवा स्तर

पाचव्या स्तरात बाधितांचे साप्ताहिक प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि प्राणवायूच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक खाटा व्याप्त असतील तर त्या जिल्ह्यांचा या स्तरात समावेश होतो. परंतु यात एकाही जिल्ह्याचा सलग दुसऱ्या आठवड्यात समावेश झालेला नाही.

लोकल रेल्वे प्रवास बंदच

नोकरदारांना या आठवड्यातही लोकल प्रवासाची मुभा मिळू शकणार नाही. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण घटलेले असले तरी मुंबईतील निर्बंध या आठवड्यातही कायम ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्येची घनता, लोकलमधील संभाव्य गर्दी आणि अतिवृष्टीचा इशारा या पाश्र्वाभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील निर्बंध शिथिल के ले नाहीत.

…म्हणून बदल नाही

’मुंबई शहराची भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, मुंबई महानगरातून रोज लोकलने दाटीवाटीने मोठ्या संख्येने मुंबईत येणारे प्रवासी…

’हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा या पार्श्वभूमीवर मुंबईत करोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अडचणी येऊ शकतात…

’हे लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पालिके ने निर्बंध कायम ठेवल्याचे पालिका आयुक्तांनी नवी नियमावली जाहीर करताना नमूद केले आहे.

आधीचीच नियमावली…

  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल रेल्वे प्रवासाची मुभा.
  • अत्यावश्यक गटातील दुकाने रोज दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू.
  • अन्य दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत आणि शनिवार-रविवार बंद.
  • मॉल्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे बंदच राहतील.
  • उपाहारगृहे सोमवार ते शुक्रवार ५० टक्के  क्षमतेने दुपारी ४ पर्यंत, नंतर घरपोच सेवा.
  • सार्वजनिक मैदाने, उद्याने, वॉकिं ग ट्रॅक दररोज सकाळी ५ ते ९ सुरू.
  • व्यायामशाळा, केशकर्तनालये, ब्युटी पार्लर दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के  क्षमतेने.
  • चित्रपट आणि मालिका चित्रिकरण स्टुडिओत किं वा गर्दी होणार नाही अशा ठिकाणी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत.
  • सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के  क्षमतेने.
  • लग्न सोहळे ५० टक्के  उपस्थितीत, तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना परवानगी.
  • बस प्रवास १०० टक्के  क्षमतेने, उभे राहून प्रवासावर बंदी. ऑनलाईन खरेदीवर कोणतीही बंधने नाहीत.

मुंबई दुसऱ्या स्तरात तरीही…

या आठवड्यात मुंबईतील करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण (संसर्ग दर) ४.४० टक्के  होते. तर प्राणवायूच्या २७.१२ टक्के  खाटा व्यापलेल्या आहेत. राज्य सरकारच्या निकषांनुसार मुंबईचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यात झाला आहे. तरीही पालिके ने मुंबईला तिसऱ्या टप्प्याचेच निर्बंध लागू के ले आहेत.