|| रेश्मा राईकवार
८० टक्के स्टुडिओ डबघाईला:- मुंबई : गेल्या दीड वर्षांत करोनामुळे चित्रपटनिर्मितीतील वेगवेगळ्या क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने प्रदर्शनासाठी रखडलेल्या आधीच्या चित्रपटांचीच संख्या मोठी आहे. ते चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत, म्हणून आधी के लेल्या कामांचे पैसे रखडले. तर नवीन चित्रपटनिर्मितीचा आकडा मंदावला असल्याने नव्याने येणाऱ्या कामाचा वेगही मंदावला आहे, अशा कात्रीत पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ सापडले आहेत.

चित्रपट-मालिकांच्या अंतिम टप्प्यातील डबिंग, मिक्सिंग सारख्या कामांबरोबरच कॅ मेरा आणि इतर चित्रपटनिर्मितीची साधने या स्टुडिओत भाडेतत्वावर उपलब्ध करून दिली जातात. मात्र करोनामुळे चहूबाजूंनी व्यवसायावर परिणाम झाला आहे. वर्षभरात १७ ते १८ चित्रपट आम्ही करत होतो. सध्या चित्रीकरणच थांबले आहे, शिवाय सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेतच चित्रीकरण सुरू असल्याने कॅ मेरा आणि इतर साधने कमी वेळासाठी भाडेतत्वावर द्यावी लागतात, त्यामुळे भाडेतत्वापोटी मिळणाऱ्या रक्कमेतही घट झाली असल्याचे विक्रांत स्टुडिओचे सुभाष काळे यांनी सांगितले. करोनामुळे अनेक स्टुडिओ बंद करावे लागले आहेत. अनेक नावाजलेल्या दिग्दर्शकांचे चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या प्रक्रियेत आहेत, मात्र निर्मात्यांना उत्पन्न नाही परिणामी पैशाअभावी चित्रपटांचे पोस्ट प्रॉडक्शन रखडले आहेत. आमच्या स्टुडिओतील मुलांची कामे गेली, अनेकांना कमी वेतनात काम करावे लागते आहे, अशी माहिती साऊं ड डिझायनर मनोज मोचेमाडकर यांनी दिली.

करोनाकाळात स्टुडिओ बंद असल्याने तेथील यंत्रे निष्क्रिय होत चालली आहेत. ७ ते ८ लाखाची यंत्र बिघडली आहेत, फर्निचर खराब झाले आहे. त्यात कामच बंद झाल्याने कर्मचारी कपातही करावी लागली. ज्या चित्रपटांचे काम के ले आहे, ते प्रदर्शित होत नाहीत, तोवर  कामाचे पूर्ण पैसे आम्हाला मिळणार नाहीत. ठरलेल्या रक्कमेतील के वळ दहा टक्के  रक्कम सुरुवातीला दिली जाते, बाकी काम पूर्ण झाल्यावर मिळते. आत्ताही आमच्या स्टुडिओत तीन चित्रपट पूर्ण तयार झालेले तसेच पडून आहेत, अशी माहिती कट पॉईंट प्रो स्टुडिओचे जय तारी यांनी दिली. आता हळूहळू नवीन कामे येऊ लागली आहेत, मात्र उत्पन्नात झालेली घट भरून निघत नसल्याचे त्यांनी  सांगितले.

भीषण स्थिती…

डबिंग, रेकॉर्डिंग, एडिटिंग अशा स्टुडिओमध्ये चालणाऱ्या विविध कामांना फटका बसला असून जवळपास ८० टक्के  प्रॉडक्शन स्टुडिओ आर्थिक डबघाईला आले आहेत. रिरेकॉर्डिस्ट, एडिटर, डीआय कलरिस्ट अशी नानाविध कामे सांभाळणाऱ्या तंत्रज्ञांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती विक्रांत स्टुडिओचे सुभाष काळे यांनी दिली.

गेल्या वर्षी चित्रपटांची कामेच नव्हती, तुटपुंज्या कामावर अर्थार्जन सुरू होते. आता मात्र दिवसेंदिवस टिकाव धरून राहणे अशक्य होत आहे. सध्या काही वेबमालिका, जाहिराती अशी कामे सुरू आहेत. मात्र स्टुडिओचे भाडे, कर्मचाऱ्यांचे वेतन सगळ्यापोटी खूप मोठी रक्कम खर्च होते, त्या तुलनेत उत्पन्न कमी असल्याने अनेक स्टुडिओ मालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.  – मनोज मोचेमाडकर, साऊं ड डिझायनर