मुंबई : मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून गेल्या महिन्याभरात ७० टक्के रुग्ण वाढले आहेत. १७ ऑगस्टला मुंबईत २,६०० इतके  रुग्ण होते. ऑगस्टमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागल्यानंतर रविवारपर्यंत उपचाराधीन रुग्णांची संख्या थेट ४,७०० वर गेली आहे.

मुंबईतील दैनंदिन रुग्णांची हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे दररोज जितके  रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यापेक्षा जास्त रुग्ण नव्याने आढळू लागले आहेत. तसेच नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या निकट संपर्कातील नागरिकही बाधित असल्याचे आढळू लागले आहे. त्यामुळे मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढू लागली की त्यांच्यापासून इतरांना होणारा संसर्ग आणि रुग्णांची संख्या वाढण्याचा धोकाही वाढत जातो. मुंबईत सध्या अंधेरी, जोगेश्वारी, विलेपार्ले, कांदिवली, बोरिवली, वांद्रे, खार, सांताक्रूजचा पश्चिाम भाग, वडाळा, नायगाव येथे सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण आहेत.

मुंबईत १७ ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या घटू लागली होती. त्यानंतर मात्र करोनाचा संसर्ग वाढू लागला. गेल्या महिन्याभरात एकू णच मुंबईत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. वीस दिवसात एक हजाराने रुग्ण वाढले होते. मात्र गेल्या दहाच दिवसात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत आणखी एक हजाराने वाढ झाली. त्यामुळे या महिन्याभरात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत दोन हजाराहून अधिक वाढ झाली आहे. महिन्याभरातील ही वाढ जवळजवळ ७० टक्क्यांहून जास्त आहे.