मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला असून बाधितांची संख्या या महिन्यात ५७ टक्क्यांनी वाढली आहे. बाधितांच्या प्रमाणात मृत्यूदरात घट झाली असली तरी मृतांच्या संख्येत या महिन्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

नव्याने निदान होणाऱ्या बाधितांची संख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २ लाख ८० हजार होती. त्या आठवड्यात १ हजार ५८३ मृत्यू झाले होते. महिन्याभरात मृतांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिलच्या चौथ्या आठवड्यात नव्याने निदान झालेल्या बाधितांची संख्या ४ लाख ३८ हजारांवर गेली आहे, तर मृतांची संख्या ५ हजार ६७८ पर्यंत वाढली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दरदिवशीची रुग्णसंख्या जवळपास ४० हजारांनी वाढत होती आणि मृतांची संख्या १०० होती. सध्या दरदिवशी निदान होणाऱ्या बाधितांची संख्या सुमारे ६५ ते ७० हजारांवर गेली आहे तर दरदिवशीच्या मृतांची संख्या जवळपास आठपटीने वाढली असून ८०० च्या घरात पोहोचली आहे.

मृतांच्या संख्येत १०० टक्क्यांहूनही अधिक वाढ नांदेड जिल्ह्यात झाली असून जिल्ह्याचा मृत्यूदरही दोन टक्क्यांहून अधिक आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मृतांच्या संख्येत ८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहमदनगरमध्येही मृतांच्या संख्येत ७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर मृत्यूदर १.४० टक्क्यांवर गेला आहे. आदिवासी बहुल भाग असलेल्या नंदुरबार येथील मृतांच्या संख्येत ८९ टक्के  वाढ झाली.

दोन टक्क्यांहून अधिक मृत्यूदर असलेले जिल्हे

राज्यात सध्या सर्वाधिक मृत्यूदर सोलापूरचा असून जवळपास ४ टक्के  आहे. त्याखालोखाल भिवंडी नगरपालिका(३.७७ टक्के), सांगली(२.८६ टक्के),कोल्हापूर(२.८३ टक्के ), सिंधुदुर्ग (२.६२ टक्के), मालेगाव(२.२८टक्के), उस्मानाबाद(२.३० टक्के), रत्नागिरी(२.१५ टक्के), नांदेड (२.२७ टक्के), सातारा(२.१९ टक्के) आणि मुंबई(२.०२ टक्के) यांचा समावेश आहे.

हरियाणात आठवडाभराची टाळेबंदी

चंडीगड : करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्यामुळे हरियाणात सोमवारपासून आठवडाभराची टाळेबंदी लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने रविवारी केली. यापूर्वी, गुरुग्राम, फरिदाबाद, पंचकुला, सोनिपत, रोहतक, कर्नाल, हिसार, सिरसा व फतेहाबाद या ९ जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजेपासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ‘३ मेपासून संपूर्ण राज्यभर सात दिवसांची टाळेबंदी लावली जाईल’, असे राज्याचे गृह व आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्विटरवर जाहीर केले आहे.