|| शैलजा तिवले
६७ टक्के लसीकरण मुंबई-पुण्यात

मुंबई: राज्यात खासगी रुग्णालयांत आत्तापर्यंत ८७ लाख ३६ हजार मात्रा दिलेल्या असून यात जवळपास ६७ टक्के लसीकरण हे मुंबई आणि पुण्यात झाले आहे. १० जिल्ह्यांमध्ये एक लाखाहून अधिक लसीकरण झाले असले तरी शहरांपुरतेच मर्यादित राहिले आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये १ मे पासून लसीकरण सुरू झाले असून गेल्या चार महिन्यांत राज्यात ८७ लाख ३६ हजार ११९ मात्रा देण्यात आल्या आहेत. मुंबईत सर्वाधिक ३३ लाख ८१ हजार तर पुण्यात २२ लाख ३ हजार लसीकरण केले गेले. याखालोखाल १४ लाख ३१ हजार ठाण्यात झाले आहे.

गावागावापर्यंत लसीकरण पोहोचण्यासाठी केंद्राने खासगी लसीकरणाला परवानगी दिली, परंतु ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांना लससाठा खरेदी करणे परवडणारे नाही. परिणामी शहरांमधील खासगी कंपन्यांनी लससाठा करून ठेवल्यामुळे खासगी रुग्णालयातील लसीकरण हे शहरांपुरतेच मर्यादित राहिले असून ग्रामीण भाग हा पूर्णत: सरकारी केंद्रावरच अवलंबून राहिला असल्याचे यावरून स्पष्ट होते.

खासगी रुग्णालयात एक लाखाहून अधिक लसीकरण झालेले जिल्हे

एक लाखाहून अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड (२,८५,७५३), नाशिक (२,०९,३००), पालघर (१,७८,०६६), औरंगाबाद (१,५४,४१७), नागपूर (१,३९,०४९), सातारा (१,१९,६६९) आणि कोल्हापूर (१,००,६७६) यांचा समावेश आहे.

मुळातच लससाठा खरेदी करण्याचे अधिकार खासगी रुग्णालयांना देण्याचे केंद्राचे धोरण चुकीचे होते. त्यामुळे हा साठा जर केंद्राने खरेदी केला असता तर इतर जिल्ह्यांमध्येही याचे वाटप होऊ शकले असते आणि ग्रामीण भागातील लसीकरण वाढण्यास नक्कीच मदत झाली असती. खासगीमध्ये लशीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध झाल्यामुळे परवडेल त्यालाच प्राधान्याने लस घेण्याची मुभा मिळाली. – डॉ. सुभाष साळुंखे, राज्याचे करोना सल्लागार