मुंबई : करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शनिवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत १२ लाख सहा हजार ३२७ नागरिकांना लस देण्यात आली असून राज्याने नवीन विक्रम नोंदविला आहे. हा आकडा रात्री उशिरापर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात आतापर्यंत दिलेल्या एकूण मात्रांची संख्या सहा कोटी २७ लाखांवर गेली आहे. देशभरात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. राज्यात २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. शनिवारी रात्री आठपर्यंत बारा लाख सहा हजाराचा टप्पा गाठून नवीन विक्रम नोंदविला आहे. आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात एक कोटी ७१ लाख जणांना लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत.

राज्यात करोनाचे ४१३० नवे रुग्ण

राज्यात दिवसभरात करोनाच्या ४१३० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ५२ हजार ०२५ इतकी आहे.  २४ तासांत मुंबई येथे ४१६, ठाणे जिल्हा ३२५, रायगड  ८३, पनवेल शहर ६८, अहमदनगर ७३०, पुणे ५०६, पुणे शहर २१८, पिंपरी-चिंचवड १९१, सोलापूर २९७, सातारा ३३७ रुग्णांची नोंद झाली.

मुंबईतही शनिवारी विक्रमी लसीकरण झाले. पालिका, सरकारी व खासगी लसीकरण केंद्रांवर मिळून एक लाख ३० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.  महापालिके च्या सर्व केंद्रांवर शनिवारी दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांनाच लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पालिके च्या केंद्रावर ८१ हजाराहून अधिक नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली. तर खासगी केंद्रांवरही ४२ हजाराहून अधिक नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली.