मुंबई : मुंबईतील ३,८७९ जणांना बुधवारी करोनाची लागण झाली, तर ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईमधील रुग्ण दुप्पटीचा कालावधी १२३, तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचले आहे.

मुंबईमधील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत आहेत. मुंबईत एकूण करोनाबाधितांची संख्या सहा लाख ६५ हजार २९९ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत १३ हजार ५४७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.  विविध रुग्णालयात उपचार घेणारे ३,६८६ रुग्ण बुधवारी करोनामुक्त झाले. एकूण पाच लाख ९८ हजार ५४५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या विविध रुग्णालयांमध्ये ५१ हजार ४७२ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी बुधवारी दिवसभरात ३५ हजार ३७७ चाचण्या करण्यात आल्या.

ठाणे जिल्ह्यात बुधवारी ३ हजार १७ नवे करोना रुग्ण आढळून आले. तर ५३ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ४ लाख ८० हजार १९४ झाली असून मृतांची संख्या ७ हजार ८३३ झाली आहे. कल्याण डोंबिवली ७८८, ठाणे ७१५, ठाणे ग्रामीण ५४५, मिरा भाईंदर ३५३, नवी मुंबई ३२४, बदलापूर १३३, अंबरनाथ ८६, उल्हासनगर ५२ आणि भिवंडीत २१ रुग्ण आढळून आले.

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे करोनाने निधन

‘छिछोरे’, ‘मलाल’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘प्रवास’ अशा हिंदी-मराठी चित्रपटांमधून काम के लेल्या अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे मंगळवारी करोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती आणि मुलगा असा परिवार आहे. अभिलाषा काही दिवसांपूर्वी वेबमालिके च्या चित्रिकरणासाठी वाराणसीला गेल्या होत्या. तिथे त्यांना ताप आला आणि त्यांची प्रकृती बिघडली. त्या तत्काळ मुंबईला परतल्या. त्यांना करोनाची लागण झाल्याने उपचारासाठी मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र अखेर मंगळवारी त्यांचे निधन झाले.

पोलिसांसाठी पश्चिम उपनगरात विलगीकरण केंद्र

पोलीस दलातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाधित पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विलगीकरणासाठी बुधवारपासून पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव पूर्वेला ‘द फर्न – अ‍ॅन इकोटेल’ हॉटेलमध्ये सुविधा सुरू करण्यात आली आहे. सुमारे १५० जण या ठिकाणी विलगीकरणात राहू शकतात. सेलो कंपनीने ही सुविधा मोफत देऊ केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासाठी उत्तर नियंत्रण कक्षाच्या ७३०२१००१०० या मोबाइलवर वा ०२२२८८५०९१८ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.