मुंबई : राज्यात करोना संसर्गाने गंभीर स्वरूप धारण केले असून शनिवारी २७ हजार १२६ नव्या रूग्णांचे निदान झाले. आतापर्यंतची एका दिवसातील ही उच्चांकी रुग्णनोंद आहे. देशातही एका दिवसात ४०,९५३ नवे रुग्ण सापडले. गेल्या १११ दिवसातील हा उच्चांक आहे.

सलग तिसऱ्या दिवशी २५ हजारांहून अधिक करोना बाधितांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. करोनाची दुसरी लाट गंभीर ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात गेले दोन दिवस २५ हजारहून अधिक बाधितांची नोंद झाली होती. शनिवारी त्यात आणखी वाढ होऊन नवीन बाधितांचा आकडा २७ हजार १२६वर पोहोचला. राज्यात गेल्या २४ तासांत ९२ रूग्णांचा मृत्यू झाला, तर १४ हजार ४०० रूग्ण बरे झाले.

सध्या राज्यात नऊ लाख १८ हजार ४०८ लोक गृह अलगीकरणात, तर ७,५९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सध्या एक लाख ९१ हजार रूग्णांवर उपचार सुरू असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्यांपर्यंत खाली आले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २९८२ नवीन रूग्णांचे निदान झाले. नागपूरमध्ये २,८७३, पुण्यात ३२००, औरंगाबादमध्ये १०१९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १४६८ लोकांना करोनाचा संसर्ग झाला.

देशात ४०,९५३ नवे रुग्ण

देशात एका दिवसात करोनाचे ४०,९५३ नवे रुग्ण आढळले. १११ दिवसांतील हा उच्चांकी आकडा असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली. गेल्या २४ तासांत १८८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने देशातील बळींचा आकडा १,५९,५५८ वर पोहोचला आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले असून आता ते ९६.१२ टक्के आहे. भारतात तीन दिवसांत एक लाख रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी ३९,७२६ नवीन रुग्ण सापडले होते, तर गुरुवारी ही संख्या ३५,८७१ होती.

मुंबईत २,९८२ बाधित

मुंबई :  मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी किं चित कमी झाली. शुक्रवारी २,९८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दैनंदिन मृतांची संख्याही शुक्रवारच्या तुलनेत कमी होती. शनिवारी ७  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.  शुक्र वारी बाधितांचा आकडा तीन हजाराच्यापुढे होता. दरम्यान, दिवसभरातील चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १३ टक्क्यांंवर गेले आहे. ठाणे जिल्ह्यात शनिवारी  १ हजार ९३२ करोना रुग्ण आढळून आले. तर सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

वर्ध्यातील रुग्णाला ‘ब्रिटन’मधील  नवकरोनाचा संसर्ग

नागपूर : वध्र्यातील एका करोनाबाधित महिला रुग्णात आढळलेला करोनाचा नवीन ‘स्ट्रेन’ हा ब्रिटनमधील असल्याचे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने (एनआयव्ही) पाठवलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

सध्या टाळेबंदीची   गरज नाही : टोपे

जालना : सध्या लगेच टाळेबंदी लागू करण्याचे कारण नाही, परंतु लोकांनी करोना निर्बंधांचे पालन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी येथे सांगितले.