करोनाबाधितांची संख्या घटली तरी मृत्यूचे प्रमाण कमी नाही

मुंबई : करोनाच्या भीतीने चाचणी न करणे, सिटी स्कॅन किंवा क्ष किरण अन्य चाचण्या करून घरीच उपचार करणे आणि रुग्णालयात उशिरा दाखल होणे यांमुळे मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड या विभागांतील रुग्णालयांत पहिल्या ४८ तासांत होणा ऱ्या मृत्यूचे प्रमाण ६४ टक्के आहे. त्यामुळे या भागातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण त्या तुलनेत कमी झालेले नाही.

लेखापरीक्षण समितीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १५,७५६ मृत्यूचे लेखापरीक्षण केले आहे. यात १५ हजारांपैकी १०,५०० मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या ४८ तासांत झाले आहेत. यात ५० वर्षांवरील आणि इतर आजार असलेल्या मृतांची संख्या १२,३४८ आहे. यावरून संसर्गाची तीव्रता वाढल्यानंतर रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याचे दिसून येते.

करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात चाचण्या वेळेत न होणे, खाटा शिल्लक नसणे यांमुळे रुग्ण उशिरा दाखल होत. त्यामुळे पहिल्या २४ किंवा ४८ तासांत मृत्यू होणा ऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक होते. परंतु आता चाचण्या आणि खाटा उपलब्ध असल्या तरी लक्षणे असूनही लोक चाचण्या करून घेण्यास तयार नाहीत. घरच्या घरी पर्यायी उपचार घेतात. लक्षणे तीव्र झाली की मग रुग्णालयात दाखल होतात. परंतु तोपर्यंत संसर्ग इतक्या प्रमाणात पसरलेला असतो की रुग्णाला वाचविणे कठीण होते. त्यातही जोखमीच्या गटातील व्यक्तींनी तातडीने चाचण्या करून वेळेत उपचार करणे अत्यावश्यक असल्याचे ‘मृत्यू लेखापरीक्षण समिती’चे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी अधोरेखित केले.

मुंबईसह या भागांतील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत नक्कीच कमी झाली आहे. बाधितांचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. परंतु मृत्यूचे प्रमाण त्या तुलनेत कमी झालेले नाही. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात अडचणी येत असल्याचे मत ‘करोना कृती दला’चे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

मुंबईत रुग्णालयात निम्म्या खाटा रिक्त

मुंबईत सरकारी आणि खासगी एकत्रित १५,१०६ खाटा करोनाबाधितांसाठी आहेत. यातील निम्म्या म्हणजे ७,६२४ खाटा सध्या रिक्त आहेत. मुंबईत ठाणे, पालघर, रायगड येथील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने सरकारी रुग्णालयात अतिदक्षता खाटा अधिकांश भरलेल्या आहेत, तर सामान्य खाटा अधिकतर रिक्त आहेत. खासगी रुग्णालयाबाबत मात्र परिस्थिती उलट असून सामान्य खाटा अधिकतर भरलेल्या आहेत.