• शहरांतील नागरिकांच्या अतिउत्साहाबाबत केंद्राच्या सूचना

  • नियम शिथिल करताना पंचसूत्र वापरण्याचा आग्रह

  • लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश

करोना निर्बंध शिथिल केल्यानंतर देशातील काही बाजारपेठा आणि अन्य ठिकाणी प्रचंड गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहखात्याने शनिवारी सर्व राज्यांना अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘पंचसूत्रीय रणनीती’ची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या.

संसर्ग रोखण्यासाठी नियमांचे पालन, चाचण्या, रुग्णांचा शोध, उपचार आणि लसीकरणावर भर देण्याचे निर्देश केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले. करोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावे, अशा सूचना भल्ला यांनी केल्या आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली, त्यापैकी काही राज्यांनी संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी अनेक निर्बंध लागू केले. मात्र स्थिती सुधारल्यानंतर त्यांनी निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात  केली. मात्र निर्बंध लागू करताना अथवा शिथिल करताना स्थितीचा आढावा घ्यावा आणि निर्बंध शिथिल करण्याची रणनीती काळजीपूर्वक आखावी, असेही निर्देश गृहसचिवांनी राज्यांना दिले आहेत.

टाळेबंदीचे नियम शिथिल करताना नियमांचे कठोर पालन, चाचण्या, रुग्णशोध, उपचार आणि लसीकरण या ‘पंचसूत्रीय रणनीती’चा अवलंब करणे अत्यावश्यक आहे, असे भल्ला यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर संसर्ग रोखण्यासाठी मुखपट्टीचा वापर, हातांची स्वच्छता, अंतर नियम आदी नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवणे आवश्यक आहे. तसेच दररोजच्या करोना चाचण्या कमी करू नयेत, असेही त्यांनी नमूद केले. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांमधील लक्षणे आणि संसर्ग दर यावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही भल्ला यांनी स्पष्ट केले. रुग्ण आढळताच सूक्ष्म संक्रमित क्षेत्रांसाठीचे निर्बंध लागू करण्याच्या सूचनाही भल्ला यांनी केल्या.

…तर ६ ते ८ आठवड्यांत तिसरी लाट : एम्स

नवी दिल्ली : निर्बंध आणि नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही आणि गर्दी टाळली नाही तर देशात पुढील सहा ते आठ आठवड्यांमध्ये करोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी दिला. करोनाची तिसरी लाट अपरिहार्य असून ती सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे, असे देशातील साथरोग तज्ज्ञांनी यापूर्वीच सूचित केले आहे.

बंदीमुळे लोणावळ्यात शुकशुकाट 

लोणावळा : पर्यटनबंदी असतानाही पर्यटक मोठ्या संख्येने शनिवारी लोणावळ्यात दाखल झाले होते. पर्यटकांनी हॉटेल, बंगले आरक्षित करून ठेवले होते. परंतु पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट परिसर शनिवारी निर्मनुष्य होते. गेल्या शनिवारी, रविवारी पर्यटकांनी आदेश धुडकावून गर्दी केल्याची गंभीर दखल घेऊन आज, शनिवारी पर्यटनस्थळबंदीची कठोरअंमलबजावणी करण्यात आली.

  • राज्यांकडे अद्याप २.८७ कोटी लसमात्रा’
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप दोन कोटी ८७ लाख लसमात्रा उपलब्ध असून त्यांना ५२ लाख २६ हजार ४६० लसमात्रा येत्या तीन दिवसांत दिल्या जातील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.
  • राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत २८ कोटी ५० लाख ९९ हजार १३० लसमात्रा मोफत पुरवण्यात आल्या.
  • त्यापैकी २५ कोटी ६३ लाख २८ हजार ४५ मात्रा वापरण्यात आल्या आहेत. त्यांत वाया गेलेल्या मात्रांचाही समावेश आहे.