रुग्णसंख्यावाढीसह मृत्यूच्या कारणांचा शोध

मुंबई : शहरात दुसरी लाट ओसरत असून काही निर्बंधही शिथिल केले आहेत, परंतु नागरिकांची वर्दळ वाढल्यावर पुन्हा रुग्णवाढ होण्याची शक्यता आहे. तेव्हा संभाव्य तिसरी लाट येण्याआधीच थोपविण्यासाठी पालिकेने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील संसर्गाच्या संक्रमणाचा अभ्यास सुरू केला आहे.

मुंबईत डोंगरी (बी), मरिन लाइन्स (सी), गोवंडी (एम पूर्व) आणि  कुर्ला (एल) विभागांमध्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे बाधितांचे प्रमाण तीन हजारांहून कमी आहे. तर वांद्रे, अंधेरी या भागांमध्ये हे प्रमाण सुमारे १२ ते १५ हजार आहे. तेव्हा या चार विभागांमध्ये बाधितांचे प्रमाण का कमी आहे हे शोधण्यासाठी पालिका अभ्यास करत आहे. या विभागांमध्ये चाचण्या कमी झाल्या की शोध घेतलेल्या संपर्कातील व्यक्तींची संख्या कमी होती, अशा अनेक शंका आहेत. त्यामुळे यामागील कारणे शोधण्यासाठी प्रश्नावली तयार केली असून सर्वेक्षण केले जाणार आहे. यातून या भागात अन्य कोणत्या आजारांचे प्राबल्य आहे, इथल्या लोकांनी आतापर्यंत कोणत्या आजारांसाठी उपचार घेतले, बाधित होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या याची माहिती संकलित केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

रुग्णांच्या मृत्यूची कारणे, करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये अन्य तक्रारी, रुग्णवाढीची किंवा रुग्णांमधील संसर्गाची तीव्रता यांचा तपशीलवार आणि विश्लेषणात्मक अभ्यास करण्याच्या सूचना वैद्यकीय महाविद्यालयांसह प्रत्येक विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि साहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत, असे काकाणी यांनी  सांगितले.

चार विभागांमध्ये छोट्या पातळीवर सेरो सर्वेक्षण

रुग्णसंख्या कमी असलेल्या या चारही विभागांतील खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये अन्य तपासणीसाठी आलेल्या रक्तांच्या नमुन्यांच्या प्रतिपिंड चाचण्या करण्याचा विचार आहे. त्यामुळे प्रतिपिंडाचे प्रमाण काय आहे, किती लोक बाधित होऊन गेले आहेत याचीही माहिती मिळेल, असे काकाणी यांनी सांगितले.