मुंबईत आतापर्यंत केवळ १४५ महिलांना लसमात्रा
मुंबई: गर्भवतींचे लसीकरण सुरू होऊन  दहा दिवस उलटून गेले तरी अजून विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईत आत्तापर्यंत केवळ १४५ महिलांनी लस घेतली आहे.

गर्भवती महिलांना करोना साथीच्या पहिल्या लाटेत विशेष धोका नसल्याचे जाणवले असले तरी दुसऱ्या लाटेत मात्र त्यांना तीव्र लक्षणे आढळली आहेत. पहिल्या लाटेत नायर रुग्णालयात ११०० गर्भवती महिला करोनाच्या उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. यातील केवळ ८ महिलांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेमध्ये ४८५ बाधितांपैकी २६ महिलांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे.

सुमारे १० ते १५ टक्के महिलांना तीव्र लक्षणे होती. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी लसीकरण उपलब्ध करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने गर्भवती महिलांच्या लसीकरणाला परवानगी दिली असली तरी करोनाचा संसर्ग झाल्यास संभाव्य धोके आणि प्रसुतीच्या काळात लसीकरणाचे माहीत नसलेले दुष्परिणाम याची माहिती दिल्यावर लस घेण्याचा निर्णय गर्भवतीचा असेल असे स्पष्ट केले आहे.  लस घेण्याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण असून लसीकरणाबाबत अनेक शंकाकुशंका या महिलांमध्ये आहेत. त्यामुळे लसीकरणाला अजून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

केंद्राच्या सूचनेनुसार मुंबईत पालिकेने १५ जुलैपासून ३५ रुग्णालयांत गर्भवती महिलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. याला आता दहा दिवस उलटले तरी पालिकेत आत्तापर्यंत केवळ ६१ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. सरकारी रुग्णालयात तर केवळ १४  महिलांनी अद्याप लस घेतली आहे. शहरात सुमारे दीड लाख महिला या गर्भवती असून त्या लसीकरणासाठी पात्र आहेत. खासगी रुग्णालयातही अत्यल्प प्रतिसाद खासगी रुग्णालयांमध्येही गर्भवती महिलांच्या लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून केवळ ७१ महिलांनीच लस घेतली आहे.

स्तनदा माताही मागेच

मुंबईत स्तनदा मातांचे लसीकरण १९ मेपासून सुरू केले आहे. स्तनदा मातांना धोका नसल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले असूनही आत्तापर्यंत ३८४७ मातांनी लस घेतली आहे. मुंबईत २०२० मध्ये सुमारे १ लाख २० हजार बालकांचा जन्म झाला होता. त्यामुळे सुमारे १ लाख २० हजार  इतक्या माता या गटात लक्ष्य आहेत. मात्र त्या तुलनेत यातील केवळ ३.२० टक्के मातांचे लसीकरण झाले आहे.

मुंबईत स्तनदा माता आणि गर्भवतींच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. ३५ केंद्रांवर आलेल्या महिलांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृतीचे प्रयत्न केले जात असून आता सविस्तर माहिती देण्यासाठी फलकही लावण्यात येणार आहेत. – डॉ. मंगला गोमारे,  कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका