१ लाख ५ हजार मात्रा प्राप्त, विभागीय केंद्रावर पूर्वनोंदणीशिवाय उपलब्ध

मुंबई : पालिकेला बुधवारी १ लाख ५ हजार लशींचा साठा मिळाला आहे. यामुळे आजपासून पुन्हा लसीकरण सुरू केल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. पालिकेला बुधवारी कोविशिल्डच्या ५७ हजार तर कोव्हॅक्सिनचे ४८ हजार मात्रा मिळाल्या आहेत.

दरम्यान, पालिकेची एकूण ३१४ लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. यापैकी मुंबईतील विभागामध्ये २७० लसीकरण केंद्रे असून येथे १८ वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना पूर्वनोंदणीशिवाय जाऊन (वॉक इन) लस घेता येणार आहे. उर्वरित केंद्रांवर मात्र ५० टक्के नोंदणी आणि ५० टक्के थेट येणाऱ्यांना लसीकरण केले जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

गर्भवती महिला, विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, विदेशात नोकरी/ व्यवसायासाठी जाणारे नागरिक यांना नेमून दिलेल्या केंद्रावरच लस देण्यात येईल.

सर्व लसीकरण केंद्रांवर, प्रत्येक सत्रामध्ये पहिल्या मात्रेसाठी ३० टक्के तर दुसऱ्या मात्रेसाठी ७० टक्के लस साठा वापरला जाणार आहे.