पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवशी शुक्रवारी लसीकरणातील नवा विक्रम प्रस्थापित झाला. संपूर्ण देशात अडीच कोटींहून अधिक लसमात्रा देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तर शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत संपूर्ण देशात सुमारे ८५ लाख लसमात्रा देण्यात आल्या.

शुक्रवारी झालेला लसीकरणाचा विक्रम म्हणजे जागतिक इतिहासातील सुवर्ण अध्याय असल्याचे ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केले आहे. एका दिवसातील विक्रमी लसीकरणामुळे देशाने शुक्रवारी रात्री १२ पर्यंत ७९ कोटी ३३ लाख लसमात्रांचा टप्पा पार केला. शुक्रवारी प्रतितास १७ लाख, प्रति मिनिट २८ हजार आणि प्रति सेंकद ४६६ लसमात्रा देण्यात आल्या, असे केंद्र सरकारतर्फे सांगण्यात आले.

कर्नाटकात शुक्रवारी सर्वाधिक २६ लाख नऊ हजारांहून अधिक, त्याखालोखाल बिहारमध्ये २६ लाख सहा हजारांहून जास्त, उत्तर प्रदेशात २४ लाखांहून अधिक, मध्य प्रदेशात २३ लाखांहून जास्त आणि गुजरातमध्ये २० लाखांहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या.

 

शुक्रवारी विक्रम…

लसीकरणात भारताने जागतिक विक्रम केल्याचे निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनीही सांगितले. एकूण लसीकरणात भारताने युरोपलाही मागे टाकल्याचा दावाही करण्यात आला.