News Flash

खासगी रुग्णालयांकडे लशीचा ५० टक्के साठा

खासगी रुग्णालयांकडून खरेदी केलेल्या बहुतांश लशींचा साठा मोठ्या शहरांमध्ये वितरण केलेला आहे.

मोठ्या रुग्णालयांची मक्तेदारी

खासगी क्षेत्रासाठी खुल्या केलेल्या लशीचा साठा खरेदी करण्यात मोठ्या रुग्णालयांची मक्तेदारी निर्माण झाली असून मे महिन्यात खुल्या केलेल्या करोना प्रतिबंध लशीच्या साठ्यापैकी सुमारे ५० टक्के साठा नऊ खासगी रुग्णालयांनी खरेदी केला आहे.  नफेखोरीला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण धोरणामुळे लशीची उपलब्धता आणि समान वितरण याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाला उत्पादन कंपन्यांकडून पुरवण्यात येणाऱ्या लससाठ्यापैकी ५० टक्के साठा खुल्या बाजारासाठी उपलब्ध करण्याचे धोरण सरकारने १ मेपासून जाहीर केले. मे महिन्यात खासगी क्षेत्राने १ कोटी २० लाख मात्रा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी केल्या आहेत. यातील ५० टक्के म्हणजे ६० लाख ५७ हजार मात्रांचा साठा देशातील आरोग्य सेवाक्षेत्रातील नऊ बड्या कंपन्यांनी खरेदी केला आहे. उर्वरित ५० टक्के साठा ३०० खासगी रुग्णालयांनी खरेदी केल्या असून यातील बहुतांश रुग्णालये ही मोठ्या शहरातील आहेत. निमशहरी भागातील तुरळक रुग्णालये यात आहेत.

मे महिन्यात सुमारे आठ कोटी मात्रांची विक्री उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी केली असून यातील ५० टक्के म्हणजे सुमारे ४ कोटी मात्रा केंद्राला प्राप्त झाल्या आहेत, तर राज्यांनी ३३ टक्के (सुमारे २ कोटी ६६ लाख) मात्रा खरेदी केल्या आहेत. खासगी रुग्णालयांना एकूण मात्रांपैकी जवळपास १५ टक्के (१ कोटी २० लाख) मात्रा खरेदी केल्या असल्या तरी या रुग्णालयांची लसीकरणाची क्षमता लक्षात घेता अजून १५ दिवसांचा साठा त्यांच्याकडे शिल्लक आहे.

कोणत्या रुग्णालयांकडे किती मात्रा?

आरोग्य सेवा क्षेत्रातील नऊ कंपन्यांमध्ये अपोलो रुग्णालय (नऊ शहरांमधून १६ लाख मात्रा), मॅक्स हेल्थकेअर (सहा शहरांमधून १२ लाख ९७ हजार मात्रा), रिलायन्स फाऊंडेशनच्या एच.एन. रुग्णालय ट्रस्ट (९ लाख ८९ लाख मात्रा), मेडिका रुग्णालय (६ लाख २६ हजार मात्रा), फोर्टिस हेल्थकेअर (आठ रुग्णालयांमध्ये ४ लाख ४८ हजार मात्रा), गोदरेज मेमोरिअल रुग्णालय (३ लाख ३५ हजार मात्रा), मणिपाल हेल्थ (३ लाख २४ हजार मात्रा), नारायण हृदयालय (२ लाख २ हजार मात्रा) आणि टेक्नो इंडिया डामा (२ लाख २६ हजार मात्रा) यांचा समावेश आहे.

 शहरांपुरतेच मर्यादित…

खासगी रुग्णालयांकडून खरेदी केलेल्या बहुतांश लशींचा साठा मोठ्या शहरांमध्ये वितरण केलेला आहे. त्यामुळे या रुग्णालयांकडून केले जाणारे लसीकरण हे शहरांपुरतेच मर्यादित राहिले आहे. अपोलो रुग्णालयाने नऊ शहरांमध्ये साठा खरेदी केला असून यातील बहुतांश लसीकरण शहरांपुरते मर्यादित असून खेड्यांमध्ये मात्र कोठेही रुग्णालयाकडून लसीकरण केले जात नाही, असे रुग्णालयानेही मान्य केले आहे.

दर अधिक

सीरम आणि भारत बायोटेक या उत्पादित कंपन्यांनी खासगी रुग्णालयांकरिता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशीच्या एका मात्रेसाठी अनुक्रमे ६०० आणि १२०० रुपये आकारले जातील असे जाहीर केले असले तरी खासगी रुग्णालये मात्र कोव्हिशिल्डसाठी ६०० ते ९०० रुपये आणि कोव्हॅक्सिनसाठी १२५० रुपये घेत आहेत. हे दर उच्चभ्रू वर्गातील नागरिकांना परवडणारे असले तरी मध्यमवर्गीय आणि त्या खालील गटाला मात्र परवडणारे नाहीत. १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरणही या रुग्णालयांमध्ये केले जात असल्याने विशिष्ट गटालाच सध्या लस मिळत आहे.

आधीच व्यवहार झाले… छोट्या रुग्णालयांना खरेदी प्रस्ताव दिलेल्या तुलनेत अगदी कमी साठा उत्पादकांकडून मिळाला आहे, तर काही मोठ्या रुग्णालयांना करारापेक्षा अधिक साठा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे लशीचे वितरणाबाबत कोणते धोरण आहे का याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. ‘आम्ही ३० हजार मात्रा खरेदीचा प्रस्ताव पाठविला होता, परंतु आम्हाला केवळ तीन हजार मात्राच मिळाल्या आहेत. मोठ्या रुग्णालयांना उत्पादक कंपन्यांकडून साठा खरेदी करणे फारसे अवघड नसल्याने त्यांनी आधीच व्यवहार केलेले आहेत’, असे हिंदुसभा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. वैभव देवगिरकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 1:34 am

Web Title: corona virus infection corona vaccine corona preventive vaccine akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक!
2 इच्छा प्रामाणिक असेल तर युतीप्रमाणेच आघाडीही टिकेल
3 Mumbai Unlock : महापालिकेकडून ‘ब्रेक द चेन’ मिशन अंतर्गत नियमावली जाहीर
Just Now!
X