समुपदेशन करण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबई : जानेवारी महिन्यापासून देशभर सुरू झालेल्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, तृतीयपंथीय वर्गात अजूनही लशीबाबत साशंकता असल्यामुळे या घटकातून लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संस्थांनी खास तृतीयपंथीयांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित केली असून तृतीयपंथियांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आता पालिकाही समुपदेशन करणार आहे.

करोना आणि टाळेबंदीची समाजातील सर्वच घटकांना झळ पोहोचली. तृतीयपंथीय त्याला अपवाद नाहीत. मुंबईत वडाळा, कुर्ला, धारावी, घाटकोपर, अ‍ॅण्टॉप हिल या भागात तृतीयपंथीयांच्या वस्ती असून टाळेबंदीच्या काळात त्यांच्या अडचणींमध्ये भरच पडली. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. आता लसीकरणाच्या मोहिमेतही त्यांच्या अनेक समस्या असल्याचे  ‘सद्भावना संघ’ संस्थेच्या वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. अनेक तृतीयपंथीयांनी लिंगबदल शस्त्रक्रिया के लेल्या असतात. तसेच त्यांना काही हार्मोन्सच्या गोळ्या, उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे लस घेतल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होईल का, अशी भीती त्यांच्या मनात आहे. त्यातही एखादा तृतीयपंथी लस घ्यायला गेलाच तरी त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतात. तृतीयपंथीयांना बऱ्याचदा घरातून हाकलून दिलेले असते. त्यामुळे त्यांच्याकडे आधारकार्ड किं वा अन्य पुरावे नसतात. या कारणांमुळेही त्यांच्या लसीकरणात अडथळे येत आहेत, असे वर्षा यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यात जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांचे लसीकरण करण्यासाठी काही सामाजिक संस्था तसेच कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यासोबतच मुंबई महापालिकेनेही आता याकामी पुढाकार घेतला आहे.

‘आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांशी याबाबत अनौपचारिक चर्चा के ली आहे. या कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीयांशी चर्चा करून त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घ्याव्यात, अशी विनंती के ली आहे. त्यांच्या अडचणी आम्हाला सांगितल्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी एक वैद्यकीय पथक आम्ही त्यांच्याकडे पाठवू, असे आम्ही ठरवले आहे,’ असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

गेले वर्षभर उपासमार

मुंबईत ‘सद्भावना संघ’ या नावाने एक सामाजिक संस्था वडाळा आणि अ‍ॅण्टॉपहिल परिसरात ‘एरिया सभा’ सभा घेत असते. संस्थेने या परिसरात ‘एरिया सभा’ घेऊन जनजागृतीचे व सरकारी मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे काम के ले आहे. या काळात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तृतीयपंथीशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न के ला. एकेका खोलीत दहा बारा जण राहत असलेल्या या समाजात गुरू-चेला पद्धत अजूनही सुरू आहे, असे संस्थेच्या कार्यकत्र्या वर्षा विद्या विलास यांनी सांगितले. तृतीयपंथीयांना नोकरी देत नसल्यामुळे देहविक्रीचा पर्याय त्यांच्यापुढे असतो, तर वृद्धत्वाकडे झुकणारे अनेक जण सिग्नलवर किंवा लोकलमध्ये लोकांकडून पैसे मागतात. टाळेबंदीत हे सारे मार्ग बंद झाल्यामुळे अक्षरश: एक वेळ उपाशीपोटी राहण्याची वेळ अनेकांवर आली, असेही वर्षा यांनी सांगितले.