परळ, लालबाग, शिवडीत रुग्णदुपटीचा कालावधी ३२० दिवसांवर

मुंबई : मध्य मुंबईतील परळ आणि शिवडी हा मराठी लोकवस्तीचा गजबजलेला भाग गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नकाशावर चर्चेचा विषय बनला आहे. या भागातील दर दिवशीची रुग्णसंख्या वेगाने कमी होत असून गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी दहाच्या आतच नवीन रुग्णांची नोंद होत आहे. विशेष म्हणजे या भागांतील रुग्णदुपटीचा कालावधी ३२० दिवसांवर आला आहे.

मुंबईत करोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. मात्र त्यातही २४ विभागांचा विचार केला तर परळ आणि शिवडीचा भाग असलेल्या एफ दक्षिण विभागामध्ये रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. मुंबईतील मशीद बंदर, डोंगरीचा तसेच गिरगाव-मुंबादेवीचा भाग असलेल्या सी व बी विभागातही रुग्णसंख्या कमी होत असली तरी या भागातील लोकसंख्या कमीच असल्यामुळे इथे रुग्णवाढ आधीपासूनच कमी होती. मात्र परळ, लालबाग, शिवडीसारख्या गजबजलेल्या भागाने रुग्णवाढ थोपवण्यात पहिला क्रमांक पटकावा ही कौतुकाची बाब मानली जात आहे.

गणेशोत्सवानंतर सप्टेंबर महिन्यात संपूर्ण मुंबईतील रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. परळ, लालबाग, शिवडी हा निवासी भाग असून या भागात चाळी, लहान घरे, झोपडपट्ट्या, सणउत्सावाच्या निमित्ताने होणारी गर्दी यांचे प्रमाण प्रचंड आहे. मात्र या भागात पालिकेने गेल्या काही महिन्यापासून सातत्याने जे काम केले, त्यामुळे येथील रुग्णवाढ आटोक्यात येऊ लागली आहे. संपूर्ण मुंबईत पालिकेने ज्या पद्धतीने करोनाची रुग्णवाढ थोपवण्यासाठी काम केले, त्याच कार्यपद्धतीनुसार या विभागातही काम केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बाधित रुग्ण आढळला की त्यांचे जास्तीत जास्त निकट संपर्क शोधून त्यांचे विलगीकरण केले गेले. चाचण्यांची संख्या वाढवली. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढू नये यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णदुपटीचा कालावधी एक वर्षावर

या भागात रुग्णदुपटीचा कालावधी ३२० दिवसांवर गेला आहे. म्हणजे सध्या या भागात ज्या वेगाने रुग्णांची नोंद होते आहे, ती पाहता येथील रुग्णसंख्या दुप्पट होण्यास तब्बल दहा महिने लागू शकतात. हा कालावधी जितका मोठा तितकी करोनाची रुग्णवाढ आटोक्यात असा निकष आहे.

दर दिवशी सरासरी साडेचारशे ते पाचशे चाचण्या एफ दक्षिण विभागात होत आहेत. रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी चाचण्या कमी केलेल्या नाहीत. परंतु, केलेल्या चाचण्यांच्या तुलनेत केवळ एक टक्का रुग्ण बाधित आढळत आहेत, ही समाधानाची बाब आहे.

– स्वप्नजा क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त, एफ दक्षिण.