नवरात्रोत्सवापाठोपाठ दिवाळीही कामाविना

मुंबई : दहीहंडी, गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही शांततेत पार पडत असल्याने उत्सवादरम्यान होणाऱ्या मोठमोठ्या सोहळ्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) कंपन्यांवर अवकळा पसरली आहे. या सोहळ्यांसाठी काम करणाऱ्या कामगार आणि कलाकारांची मोठी फळी बेरोजगार झाली आहे.  दिवाळीही अशाच पद्धतीने जाणार असल्याने या क्षेत्रातील हजारो लोकांसमोर उदरनिर्वाहाची टांगती तलवार आहे.

करोना संसर्गाच्या भीतीने सण- सोहळ्यावर निर्बंध घातले गेल्याने दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा सणांच्या निमित्ताने सोहळ्यांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या कार्यक्रम व्यवस्थापन कंपन्या सध्या मरणासन्न अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे नवरात्रोत्सव आणि दिवाळीमध्ये गरबा, दांड्या, सांस्कृतिक कार्यक्रम, सांगीतिक सोहळे यांना खास मागणी असते, परंतु उत्सवांचे स्वरूप बदलल्याने या क्षेत्रावर उपासमारीची वेळ आली आहे. ‘दहीहंडी ते ३१ डिसेंबर हा आमचा हंगाम असतो. तोच निसटल्याने अधिकच गंभीर परिस्थिती आहे. या क्षेत्रात सर्वाधिक तरुण मंडळी आहेत. आज कुटुंबाचा चरितार्थ चालवताना त्यांची कसरत होत आहे,’असे वास्तव ‘लाइट एंड शेड इव्हेंट’चे संदीप वेंगुर्लेकर यांनी

मांडले. मुंबईतील नामांकित मानल्या जाणाऱ्या बोरिवलीतील कोरा केंद्र गरब्याच्या आयोजनात दोनशे ते अडीचशे लोकांचा हातभार लागतो. कलाकारांपासून ते अगदी हमाल काम करणाऱ्या कामगारापर्यंत प्रत्येकाला रोजगार मिळत असतो. नऊ दिवसांत अंदाजे दोन कोटींचा खर्च या सोहळ्यावर केला जातो, परंतु यंदा गरबा होणार नसल्याने हे कामगार कामावाचून बसले आहेत, अशी माहिती कोरा केंद्र गरब्याचे तेजन बटोद्रा यांनी दिली.

अभिनेते सुशांत शेलार यांची ‘समर्थ व्हिजन’ ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. ज्याअंतर्गत दहीहंडी, दांड्या, वर्षभरातील बरेच सांस्कृतिक आणि मनोरंजनावर आधारित सोहळे केले जातात. ‘कलाकारांना काय कमी आहे अशी अनेकांची धारणा असते; पण काळासोबत आलेली उपासमार आमच्याही दारापर्यंत येते. अभिनयासोबतच मी कंपनी चालवतो. आता कंपनी असल्याने अनेक जण भूमिकांसाठी विचारत नाही, तर गेल्या आठ महिन्यांत एकही सोहळा करता आला नाही. मग नेमका कशातून रोजगार मिळवायचा,’ असा प्रश्न शेलार यांनी केला आहे. दैनंदिन खर्च, बँकेचे हप्ते कसे भागवायचे याच विचारात इथला प्रत्येक कामगार आहे, असेही ते म्हणाले.

सोहळ्याचे आयोजन करणारी एक कंपनी असली तरी त्याअंतर्गत जवळपास ३०० विभाग काम करत असतात. प्रत्येक कंपनीत १५० ते २५० जण आहेत. यात मंडपाचा खांब रोवण्यापासून ते सोहळ्याचे चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला रोजगार मिळत असतो. गेले आठ महिने सोहळे बंद असल्याने इथल्या कामगारांवर उपासमारीची भीती आहे.

– संदीप वेंगुर्लेकर, प्रमुख, लाइट अँड शेड इव्हेंट