मुंबई : प्रत्येक बाधित रुग्णामागे ३० निकट संपर्क शोधणे अपेक्षित असले तरी मुंबईत अनेक कारणांमुळे हे शक्य होताना दिसत नाही. सध्यातरी एका रुग्णामागे जास्तीतजास्त पाच ते दहा नागरिकांचे संपर्क शोधले जात आहेत. मनुष्यबळाचा अभाव, नागरिकांचे असहकार्य अशा अनेक कारणांमुळे रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

फेब्रुवारीनंतर मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागली तेव्हा प्रत्येक रुग्णामागे निकट संपर्क शोधण्याचे प्रमाण वाढवण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी विभाग कार्यालयांना दिले होते. त्यानुसार निकट संपर्क शोधण्याचे प्रमाण विभाग स्तरावर वाढवण्यात आले. यात अगदी जवळचे म्हणजेच अतिजोखमीचे संपर्क आणि कमी जोखमीचे असे दोन गटांत संपर्क शोधून त्यांच्या चाचण्या के ल्या जात आहेत. मात्र तरीही हे प्रमाण आयसीएमआरने दिलेल्या निकषांपेक्षा कमी आहे. बहुतांशी उच्चभ्रू इमारतींमध्ये विभक्त कु टुंबे आहेत. एका घरात जास्तीतजास्त चार ते पाच जण असतात.  एक जण बाधित आला की कु टुंबातील सगळे बाधित येतात. त्यामुळे त्या चार ते पाच जणांच्या संपर्कात आलेले अतिजोखमीचे लोक हे मोजके च असतात. प्रत्येक रुग्णामागे ३० संपर्क अशा वेळी नसतात. त्यामुळे मुंबईतील संपूर्ण आकडेवारीचा विचार करता हे प्रमाण कमी असल्याचे दिसते.

रुग्णच्या  कामाच्या ठिकाणी आम्ही कळवतो. पण त्या कार्यालयात चाचण्या के ल्या तर त्याची गणना रुग्णाच्या विभागात होत नाही, हेदेखील कारण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मनुष्यबळाची कमतरता

पालिके कडे सध्या मनुष्यबळाची कमतरता आहे, हे त्याचे प्रमुख कारण आहे. अनेक अधिकारी खासगीत हे कारण मान्यही करतात. चाचण्या वाढवणे, लसीकरण करणे, बाधितांचा विशेषत: गृह विलगीकरणातील लोकांचा पाठपुरावा करणे अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे निकट संपर्क शोधण्यावरही त्याचा परिणाम होत असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र मुंबईत निकट संपर्क शोधण्यात इतरही अनेक अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांच्या सहकार्याचा अभाव…

निकट संपर्क शोधणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होते. मात्र मुंबईत सध्या जे रुग्ण सापडत आहेत ते बहुतांशी इमारतीतील आहेत. काही उच्चभ्रू इमारतीत एका मजल्यावर दोनच भल्यामोठ्या सदनिका असतात. एखाद्या घरात एक रुग्ण सापडला की त्याच्या घरातले लोक आणि त्याच्या मजल्यावरील शेजारी हे अतिजोखमीच्या गटात मोडतात. मग त्यांच्या आम्ही चाचण्या करतो. मात्र उच्चभ्रू इमारतीत अनेक लोकांचे अनेक आक्षेप असतात. बाधित आमच्या मजल्यावर राहत असला तरी आमचा त्याच्याशी काहीच संबंध येत नाही. आम्ही त्याला ओळखतही नाही, अशी उत्तरे  मिळतात.  तरीही आम्ही त्यांच्या चाचण्या करतो. त्यांना समजावतो, रुग्ण तुमच्या मजल्यावर राहतो, त्यामुळे इमारतीचा सामाईक जागा, उद्वाहन हे तुम्ही दोघांनीही वापरलेले आहे. त्यामुळे तुम्हाला संसर्गाचा धोका आहे. असे समजावून आम्ही त्यांच्या चाचण्या करतो, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला अशीही परिस्थिती आहे की अनेक रुग्णांना आपण कोणाला भेटलो हेच आठवत नसते किं वा त्यांना ते सांगायचे नसते. ओळखीच्या व्यक्तीच्या नाव सांगितले तर त्याला ते आवडणार नाही अशा भीतीने हे नाव लपवले जात असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.