संसर्ग रोखण्यासाठी पालिकेची खबरदारी; धार्मिक स्थळे, गर्दीच्या ठिकाणांवर नजर

मुंबईत दिवसभरात ९८७ रुग्ण; चार जणांचा मृत्यू

मुंबई : दाटीवाटीने उभ्या असलेल्या धारावीमध्ये हळूहळू करोनाचा संसर्ग वाढू लागला असून सतर्क झालेल्या मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा धारावीतील घराघरांत जाऊन तपासणी सत्र सुरू केले आहे. त्याचबरोबर गर्दीची ठिकाणे आणि धार्मिक स्थळी येणाऱ्या नागरिकांची तपासणी आणि गरजेनुसार चाचणीही करण्यात येत आहे. रुग्ण सापडू लागल्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील संशयित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील डॉ. बालिगा नगरमध्ये १ एप्रिल २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्याच दिवशी रात्री त्याचा मृत्यू झाला. यामुळे धारावीकरांचेच नव्हे तर पालिका अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले. दाटीवाटीने झोपड्या खेटून उभ्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर करोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाने पालिका कर्मचारी आणि खासगी डॉक्टरांच्या पथकांमार्फत धारावीतील घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी सुरू केली. पालिका आणि खासगी डॉक्टरांचे दवाखाने सुरू केले. मोबाइल दवाखान्यांची सुविधा उपलब्ध केली. संस्थात्मक विलगीकरण केंद्रांची सुविधा उपलब्ध केली. शौचालयांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला. वेळीच बाधित, संशयित रुग्णांना शोधून विलगीकरणात ठेवल्यामुळे धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. आता पुन्हा एकदा धारावीतील रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

आठवड्यापूर्वी धारावीमध्ये दररोज पाच ते सात नवे बाधित रुग्ण सापडत होते. मात्र गेल्या आठवड्यात रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. धारावीत २६ फेब्रुवारी रोजी १६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आहे.

रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे पालिका सतर्क झाली असून गर्दीची ठिकाणे, प्रार्थनास्थळी जाणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तीची चाचणी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा धारावीतील प्रत्येक घरातील रहिवाशांची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी दादरमधील वनिता समाज संस्थेच्या विलगीकरण केंद्रात अवघे तीन-चार रुग्ण होते. पण आजघडीला ही संख्या ७० वर पोहोचली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या गटातील संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर चाचण्या करून बाधित, संशयित रुग्णांना अन्य नागरिकांपासून वेगळे ठेवून संसर्गावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

रुग्ण वाढीला आळा घालण्यासाठी मुंबई पालिकेने मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि लक्षणे असलेल्यांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. मुंबईत रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरू असून, शनिवारी ९८७ जणांना करोनाची बाधा झाली. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेले दोन-तीन दिवस सतत एक हजारांहून अधिक मुंबईकरांना करोनाची बाधा झाली होती. मात्र शनिवारी नव्या रुग्णांची संख्या तुलनेत काही प्रमाणात घसरली आहे. शनिवारी ९८७ रुग्णांना करोनाची बाधा झाली. आतापर्यंत मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाख २४ हजार ८६४ वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या चार रुग्णांचा शनिवारी करोनामुळे मृत्यू झाला असून यापैकी तिघांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत ११ हजार ४६५ मुंबईकरांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या करोनाबाधितांपैकी ८०१ रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत तीन लाख तीन हजार ३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के आहे. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये नऊ हजार ४९६ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मुखपट्टीविना फिरणाऱ्यांकडून ३४ कोटी ६२ लाख वसूल

करोनाविषयक नियम धुडकावून मुखपट्टीविना अथवा मुखपट्टीचा योग्य प्रकारे वापर न करणाऱ्या तब्बल १७ लाख १३ हजार ३८५ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे ३४ कोटी ६२ लाख ८४ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पालिका, पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी दिवसभरात १९ हजार ८४९ जणांवर कारवाई करून ३९ लाख ६९ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या दोन हजार २६३ प्रवाशांकडून चार लाख ५२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.