दोन विभाग कार्यालयांची एकत्रित तपासणी मोहीम
मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ वेगाने होऊ लागली आहे. त्यातही कु र्ला नेहरूनगर आणि टिळकनगर भागात रुग्णांची संख्या वाढत असून या परिसरात शनिवारी आणि रविवारी एकत्रित विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून मुलुंड, कु र्ला आणि टिळकनगर परिसरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१४ टक्के असताना चेंबूर, टिळकनगरचा भाग असलेल्या एम पश्चिम विभागात हाच दर ०.२८ टक्क्यांवर गेला आहे तर मुलुंडचा भाग असलेल्या टी विभागात ०.२२ टक्के आणि कु ल्र्याचा समावेश असलेल्या एल विभागात ०.१७ टक्के इतका झाला आहे. कु र्ला विभागातील नेहरूनगर आणि त्याला लागूनच असलेल्या एम पश्चिम विभागातील टिळक नगर भागातच रुग्णवाढ होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दोन विभागातील पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
शनिवार आणि रविवार असे दोन दिवस या भागातील प्रत्येक इमारतीत, वसाहतीत जाऊन लोकांची तपासणी करण्यात आली. शरीराचे तापमान आणि प्राणवायूची पातळी तपासण्यात आली. संशयितांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. पालिकेच्या सर्व दवाखान्यांव्यतिरिक्त १६ ठिकाणी करोनाच्या चाचण्या के ल्या जात आहेत, तसेच विभाग कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाच्या चाचण्या केल्या जात आहेत. तर नेहरूनगर टर्मिनसवरही परराज्यातून आलेल्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत ६४५ नवे रुग्ण, ४ मृत्यू
मुंबईत रविवारी ६४५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णवाढीचाही दर वाढला असून दुपटीचा कालावधीही कमी झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१२ टक्के होता तो वाढून ०.१४ टक्क्यांवर गेला आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी ४७९ दिवसांपर्यंत खाली घसरला आहे. हाच कालावधी ८ फे ब्रुवारीला ५७४ दिवस होता. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या ३,१४,०७६ झाली आहे. तर आतापर्यंत २ लाख ९६ हजारांहून अधिक रुग्ण म्हणजेच ९४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ५६०८ रुग्ण उपचाराधीन आहेत. दरम्यान, चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याचे प्रमाणही वाढले असून शनिवारी १६,३०० चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत ३० लाख १४ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
एल विभागात रुग्ण मोठ्या संख्येने आढळू लागल्यानंतर आम्ही रुग्णसंख्येचा अभ्यास केला. नेहरूनगर भागात गेल्या पंधरा दिवसांत ६३ नव्या रुग्णांची नोंद झाली. ३० वेगवेगळ्या इमारतींमध्ये हे रुग्ण विखुरलेले होते. त्यामुळे इमारत प्रतिबंधित करता येत नव्हती. टिळकनगर येथेही अशीच परिस्थिती होती. या भागात पंधरा दिवसांत १०० रुग्ण आढळून आले आहेत. – डॉ. जितेंद्र जाधव, एल विभागाचे आरोग्य अधिकारी
रुग्णवाढीचा दर
- मुंबईचा सरासरी दर – ०.१४ टक्के
- एम पश्चिम (चेंबूर, टिळकनगर) – ०.२८ टक्के
- एल (कुर्ला) – ०.१७ टक्के
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2021 1:51 am