लोकल प्रवासाला परवानगी मिळाल्याने सर्वसामान्यांत आनंद; वेळेच्या बंधनावर मात्र नाराजी

मुंबई/ठाणे : गेल्या दहा महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेली उपनगरी रेल्वेसेवा सोमवारपासून सुरू करण्याच्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रस्तेप्रवासाची दगदग, त्यात खर्च होणारा वेळ आणि पैसा या त्रासातून सुटका होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, राज्य सरकारने परवानगी देताना घातलेले वेळेचे बंधन अनाठायी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सकाळी कामाच्या वेळेत प्रवासाला मनाई करण्याच्या निर्णयाविरोधात प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासास मुभा दिली आहे. मात्र, त्यासाठी दिलेली वेळेची मर्यादा गैरसोयीची आहे, अशी खंत उपनगरीय रेल्वे महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी व्यक्त के ली. सरकारने कंपन्यांनाही त्यांच्या वेळेत बदल करावे असे सुचविले आहे. मात्र, या कंपन्या त्याची अंमलबजावणी करतात की नाही याकडे सरकारने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यालयीन वेळा बदलल्या तरीही सर्वच कार्यालये ठरावीक वेळेत खुली झाल्यास रेल्वेत पुन्हा गर्दी वाढणार आहे. त्यामुळे याचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे ‘ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’चे कार्यकारी सचिव एकनाथ सोनावणे यांनी सांगितले.

खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या पाहता त्यांचाही विचार होणे गरजेचे होते, असे मत वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले. सकाळी ७ ऐवजी ८ पर्यंत लोकल प्रवासाची परवानगी दिली असती तर उपनगरातून येणाऱ्यांना काहीसा फायदा मिळाला असता. घरातून स्थानकापर्यंत येणे, तिकीट काढणे याचे नियोजन करून प्रवाशांना आठ वाजेपर्यंत प्रवेश मिळवता आले असते. परंतु सकाळी ७ ची वेळ ही खूपच लवकरच होते. सर्वसामांन्यांना प्रवासासाठी दिलेल्या वेळेचा शासनाने अभ्यास करावा. यातून होणारी गर्दी, येणाऱ्या समस्येनंतर काही दिवसांनी त्यात बदल करता येतो का ते पाहता येईल, असा सल्ला दातार यांनी दिला.

३१३ दिवसांनंतर…

मुंबई : मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या ८० लाख सामान्य प्रवाशांचा प्रवास २५ मार्च २०२० पासून बंद होता. जून २०२० पासून सुरुवातीला अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी आणि नंतर महिलांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. मात्र सर्वसामान्यांना लोकलप्रवासासाठी तब्बल ३१३ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली. या दहा महिन्यांतील रेल्वे घडामोडींचा आढावा…

२० मार्च २०२० – करोनाच्या पाश्र्वभूूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम व मध्य रेल्वेवरील वातानुकू लित लोकल सेवा बंद.

२५ मार्च – मुंबई उपनगरीय लोकल ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. नंतर हा कालावधी वाढत गेला.

१५ जून  – सरकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार आणि विरार ते डहाणू दरम्यान सुमारे १२० लोकल फे ऱ्या, तर मध्य रेल्वेवरील मुख्य मार्ग, हार्बर ट्रान्स हार्बर मार्गावर सुमारे २०० लोकल फे ऱ्या.

१ जुलै – केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मंजुरी, राष्ट्रीयीकृत बँका, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचाही समावेश. लोकल फे ऱ्यांमध्ये वाढ.

२२ जुलै – सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू नसल्याच्या निषेधार्ह नालासोपारा स्थानकात नागरिकांचा उद्रेक.

५ सप्टेंबर – वेळीच बेस्ट, एसटी गाड्या उपलब्ध न होणे, रिक्षा चालकांचा मनमानी कारभार यामुळे संतप्त नागरिकांचा बोरिवली स्थानकात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न.

१ ऑक्टोबर – मध्य रेल्वेवरील महिला विशेष लोकल फे ऱ्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दोन महिला विशेष लोकल फे ऱ्या सुरू.

१५ ऑक्टोबर – पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित रेल्वेसेवा सुरू. दररोज दहा फेऱ्या. सामान्य लोकलफेऱ्यांमध्येही वाढ.

२१ ऑक्टोबर – सर्वच महिलांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासास परवानगी. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर शेवटची लोकल सुटेपर्यंत सर्वच महिलांना लोकल प्रवासाची मुभा.

२ नोव्हेंबर -सीएसएमटी ते अंधेरी ते गोरेगाव हार्बर लोकल सेवा पुन्हा सुरू.

१३ नोव्हेंबर  – शालेय शिक्षकांनाही लोकल प्रवासाची परवानगी.

२० नोव्हेंबर – नेरुळ ते खारकोपर लोकल सेवा सुरू.

१७ डिसेंबर – सीएसएमटी ते कल्याण मार्गावर वातानुकू लित लोकलच्या दहा फेऱ्या सुरू.

२९ जानेवारी २०२१- मुंबई उपनगरीय प्रवासी संख्या २१ लाखांपार. त्यामुळे पश्चिम व मध्य रेल्वेवरील एकू ण लोकल फे ऱ्या दोन हजार ७८१ वरून दोन हजार ९८५ पर्यंत वाढविल्या.

विनातिकीट प्रवास समस्या कायम?

टाळेबंदीत सर्वांसाठी लोकल प्रवास नसल्याने अनेक जण स्थानकात प्रवेश मिळवून विनातिकीट प्रवासाचा प्रयत्न करू लागले आहेत. मध्य रेल्वेवरून विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे १ लाख ७६८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन कोटी ३९ लाख रुपये दंड वसुली के ली असून प्रतिदिन विनातिकीट प्रवास करणारे सुमारे दोन हजार प्रवासी आढळत असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. शिवाय अत्यावश्यक सेवा कर्मचारी असलेले ७०० बनावट ओळखपत्रेही जप्त के ले आहेत.

१ फे ब्रुवारीपासून सकाळी ७ वाजेपर्यंत आणि दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ नंतर लोकल प्रवासाची मुभा सामान्य प्रवाशांना दिली आहे. परंतु खासगी कार्यालयीन कर्मचारी व अन्य कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना या वेळा योग्य नसल्याने यातील अनेक प्रवासी विनातिकीट प्रवासाचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांसाठी आता उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार होत आहे. मात्र सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होणार नाही. अनेक व्यापारी रेल्वेने ये-जा करीत असतात. जर गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा सुरू नसेल तर व्यापाऱ्यांना खासगी वाहनानेच मुंबई गाठावी लागेल. -आशीष शिरसाट, वरिष्ठ उपाध्यक्ष, ठाणे व्यापारोद्योग महासंघ.

सकाळी ७ च्या आधी सुरू होणाऱ्या कार्यालयांची संख्या ही किती असेल हे पाहिलेले नाही. त्यामुळे यातून सर्वांनाच दिलासा मिळेल असे नाही. तसेच दुपारी १२ ते ४ पर्यंतचीही वेळही योग्य नाही. या वेळांचा पुन्हा विचार करावा यासाठी पत्रव्यवहार करणार आहोत. – कैलास वर्मा, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ

 

माझी कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची आहे. मात्र, राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी रेल्वेची वेळ ठरवून दिली आहे. त्यावेळेत मला प्रवास करताच येऊ शकत नाही. सकाळच्या वेळेत रेल्वे सेवा उपलब्ध नसेल तर तिचा उपयोग काय? – भक्ती शेट्ये, ठाणे

 

आपल्या कार्यालयाची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशी आहे. कार्यालय फोर्ट भागात असून सरकारने लोकल प्रवासासाठी घातलेल्या वेळेच्या मर्यादेमुळे अडचण निर्माण होणार आहे. लोकल सेवा कार्यालयीन वेळ साधून असायला हवी होती. – शेखर मोरे,ठाणे

 

चित्रपटसृष्टीतील कामाच्या वेळा बदलत असतात. त्यामुळे राज्य सरकारने घातलेल्या वेळ मर्यादेमुळे लोकल प्रवासाचा उपयोग होणार नाही. त्यामुळे लोकल प्रवासाची वेळ बदलायला हवी. – मिलिंद सकपाळ, चित्रपटसृष्टीतील कर्मचारी

 

कार्यालयीन वेळा जुळवून घेण्यासाठी सर्वसामान्यांना सकाळी ९ पर्यंत लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळायला हवी. त्याचबरोबर कार्यालय सुटण्याची वेळ लक्षात घेऊन संध्याकाळी ६ नंतरही प्रवासाची मुभा हवी. – अमित बिरोदकर, मुंबई