‘डेल्टा प्लस’च्या धोक्यामुळे निर्णय; सध्याच्या निकषांत दोन दिवसांत बदल

मुंबई : करोनाच्या उत्परिवर्तीत (डेल्टा प्लस) विषाणूचा धोका, काही जिल्ह्यांतील करोनाबाधितांच्या आकडेवारीत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येण्याचे संकेत आहेत.

करोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून लागू असलेले कठोर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय २० दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यानुसार करोनाबाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांत विभागणी करण्यात आली होती. दर आठवड्याला परिस्थितीनुसार हे निर्बंध कमी -अधिक प्रमाणात लागू करण्याचे धोरण राबविण्यात आले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून या धोरणानुसार महापालिका आणि जिल्हा स्तरानुसार निर्बंध लागू के ले जात आहेत.

मुंबई, पुणे, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत ६७ हजार ३३० उपचाराधीन रुग्ण असून सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, रायगड या पाच जिल्ह्यांत २६ हजार ६४० असे १० जिल्ह्यांत ९४ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. तर ४२ हजार रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. १० जिल्ह्यांतील साप्ताहिक बाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहेत. निर्बंध शिथिल के ल्यापासून बाधितांच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्याच्या सूत्रावर आणि त्याच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्रीही नाराज असून तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे निर्बंध पूर्वीप्रमाणे कठोर करण्यावर बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार सध्याची पद्धती बदलून किं वा ती रद्द करून नवीन निर्बंधांबाबत दोन दिवसांत आदेश काढण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

निर्णय का?

निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राज्यात करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचे (डेल्टा प्लस) २१ रुग्ण आढळून आले. या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोक्याचा इशारा कें द्र सरकारने दिल्यामुळे राज्य सरकाची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय होणार?

सध्याच्या निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात १० हजारांहून अधिक नवे रुग्ण

मुंबई :  गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे १०,०६६ नवे रुग्ण आढळले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. गेला आठवडाभर रुग्णसंख्या कमी होत गेली. पण गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा १० हजारांपेक्षा अधिक झाली. दिवसभरात १६३ जणांचा मृत्यू झाला.

‘डेल्टा प्लस’चे देशात ४० रुग्ण

नवी दिल्ली : करोनाच्या उत्परिवर्तित ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे देशात आतापर्यंत ४० रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये हे रुग्ण आढळले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. देशात आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात आले असून, त्यातून ‘डेल्टा प्लस’च्या उत्परिवर्तित विषाणूचे रुग्ण समोर आले आहेत.