बाजारपेठांमध्ये नियमांची पायमल्ली; खरेदीसाठी झुंबड

मुंबई : सुट्ट्यांच्या दिवशी बाजारपेठांमध्ये गर्दी टाळता यावी यासाठी शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले होते. परंतु या नियमांची पायमल्ली करत शनिवारी फेरीवाल्यांनी बाजारपेठांमध्ये मोठ्या संख्येने ठेले लावले, तर दुकानदारांनीही दार अर्धे खुले ठेवून खरेदी-विक्री सुरू ठेवली. परिणामी, बाजारपेठांमध्ये नागरिकांची झुंबड उडाली होती.

धारावी, माटुंगा, अंधेरी, बोरिवली, दादर, लालबाग सगळीकडे काहीसे हेच चित्र होते. काही ठिकाणी गर्दी वाढल्याने पोलिसांनी कारवाई करत दुकाने बंद केली आणि फेरीवाल्यांनाही पळवून लावले. दादर बाजारपेठेत तर अंतरनियमाचा पूर्णत: फज्जा उडलेला होता. लोकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दादर स्थानकापासून ते वीर कोतवाल उद्यानापर्यंत शेकडो फेरीवाले होते. दुकानदारांकडूनही उल्लंघन काही दुकानदारांनी अर्धे दार उघडे ठेवून विक्री केली. शनिवारी गर्दी होणार याचा अंदाज घेऊन साडी, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक आणि इतर दुकानदारांनी आपले कर्मचारी दुकानांबाहेर उभे केले होते. दाराशी आलेल्या ग्राहकांना मागच्या बाजूने दुकानात प्रवेश देऊन दुकानदारांनीही नियमांची पायमल्ली केली.