‘अ‍ॅनारॉक’ अहवालातील माहिती; करोना साथीचा परिणाम

मुंबई : मुंबई प्रादेशिक परिसरात सध्या सुरू असलेल्या विविध गृहप्रकल्पांतून सव्वालाख घरे या वर्षअखेरीस प्रत्यक्ष ताब्यासाठी उपलब्ध होणार होती. परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आता ही प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. आणखी काही महिने त्यासाठी लागण्याची शक्यता ‘अ‍ॅनारॉक’ या घरांचे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

देशभरात येत्या वर्षअखेर चार लाख २२ हजार घरे तयार होण्याची शक्यता होती. परंतु आता ही वेळ पाळता येणार नसल्याचे या विकासकांचे म्हणणे आहे. काही विकासक ही वेळ पाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यापैकी एक लाख नऊ हजार ९४० घरे मुंबई प्रादेशिक परिसरात आहेत. यापैकी ४० टक्के घरे ही परवडणारी तर २४ टक्के मध्यमवर्गीयांसाठी आणि १८ टक्के उच्चवर्गीयांसाठी आहेत. फक्त १७ टक्के घरे आलिशान आहेत. पुण्यात या वर्षअखेरीस ७४ हजार २० घरे तयार होण्याची शक्यता होती. त्यामध्ये ५९ टक्के परवडणारी घरे आहेत. ३० टक्के मध्यम तर नऊ टक्के उच्चवर्गीयांसाठी आहेत. आलिशान घरे फक्त दोन टक्के आहेत. परंतु ही सर्व घरे आता या वर्षअखेरीस तयार होण्याची शक्यता कमी आहे.

अ‍ॅनारॉक कंपनीचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी म्हटले आहे की, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या घरांच्या बांधकामांमध्ये काही प्रमाणात अडचण निर्माण झाली.

पहिल्या लाटेचा अनुभव घेतलेल्या विकासकानी त्यातही मार्ग काढत बांधकाम थांबू नये, यासाठी प्रयत्न केले. तरीही कामाचा वेग कमी झाला. त्यामुळे या वर्षअखेरीस ही घरे तयार होण्याची शक्यता कमी आहे. सध्या घरांची विक्री थंडावली आहे. करोनाच्या भीतीमुळे सध्या ग्राहकही बाहेर पडण्याचे टाळत आहे. परंतु घरांच्या विक्रीत येत्या काही महिन्यांत वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.