मुंबईसह अनेक शहरांत टंचाई; आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान

 

मुंबई : महाराष्ट्रासह देशात वेगाने फैलावणाऱ्या करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या आरोग्य यंत्रणेपुढे आता प्राणवायू टंचाईचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांत प्राणवायूचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे हाल सुरू आहेत.

मुंबई पालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल, जोगेश्वारीतील ट्रॉमा रुग्णालय या सहा रुग्णालयांतील प्राणवायूचा साठा संपुष्टात आला. त्यामुळे तेथील १६८ रुग्णांना इतर रुग्णालये आणि करोना केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार अतिदक्षता विभागातील एकूण २,७११ पैकी केवळ ३७, तर व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या १,३५८ पैकी केवळ १७ खाटा शिल्लक आहेत. प्राणवायूची सुविधा असलेल्या १,१९५ खाटा रिकाम्या आहेत. मुंबईतील पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन, तसेच प्राणवायू उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी पालिकेने सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.

रुग्णसंख्या जास्त असलेल्या नागपूर, पुणे, नाशिक, नगर, सांगली, लातूर आदी जिल्ह्यांमध्येही प्राणवायूसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये नगर जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असताना मागणीच्या तुलनेत निम्माच प्राणवायूचा पुरवठा होत आहे. लवकरात लवकर पुरेसा प्राणवायू उपलब्ध न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराच नगरमधील वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेने सरकारी यंत्रणांना शनिवारी दिला.

औरंगाबाद शहरात सध्या तरी परिस्थिती आटोक्यात असली तरी रुग्णसंख्या वाढल्यास प्राणवायूचा तुटवडा जाणवू शकतो. नाशिक शहर व जिल्ह्यात शनिवारपासून प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला. प्राणवायूचा पुरवठा न झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी के ला. नाशिकमध्ये प्राणवायूचा पुरवठा वाढविण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर सारे प्रयत्न सुरू के ले आहेत. लातूर शहर व आसपासच्या परिसरात मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्राणवायूची टंचाई जाणवू लागली आहे. सांगलीमध्येही मागणीच्या तुलनेत प्राणवायूचा पुरवठा होत नाही. रायगड जिल्ह्यात मोठे उद्योग असल्याने तेथून प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत आहे.

विदर्भात सर्वच जिल्ह्यांत, विशेषत: ग्रामीण भागांत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत असताना त्यांना सामावून घेण्यासाठी नवीन रुग्णालयाच्या मंजुरीत प्राणवायूचा पुरवठा हा सर्वात मोठा अडसर ठरला आहे.

गडकरींच्या प्रयत्नांनी प्राणवायू मिळवण्यात यश

नागपूरमधील रुग्णालयांत प्राणवायूचा तुटवडा लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक दायित्व निधीमधून शनिवारी विशाखापट्टणम येथून दोन हजार प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर मागवले आहेत. याशिवाय सज्जन जिंदाल यांनी २० टन प्राणवायू वहन क्षमता असलेले दोन टँकर्स पूर्ण वेळ नागपूरसाठी दिले आहेत. या टँकर्समुळे ‘भिलाई स्टील प्लांट’मधून रोज ४० टन प्राणवायू नागपूरला मिळणार आहे.

पुण्यातही तुटवडा

शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्राणवायू पुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. पुण्यातील विविध रुग्णालयांमधून ५६०० रुग्ण प्राणवायू खाटांवर उपचार घेत आहेत. तसेच अत्यवस्थ रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. या रुग्णांना प्राणवायू अत्यावश्यक आहे. मात्र, मागणी वाढल्याने प्राणवायूचा पुरवठा होण्यास वेळ लागत असल्याचे रुग्णालयांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जेजुरी औद्योगिक वसाहतीत नव्याने प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारण्यात येत आहे. महापालिके च्या दळवी रुग्णालयातही प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे. चाकण येथील प्राणवायू उत्पादन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला आहे. सिलिंडर पुनर्भरण करण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून पुण्यात २८ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट के ले.

मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांशी संपर्काचा प्रयत्न, पण…

मुंबई : महाराष्ट्रातील करोना रुग्णांसाठी प्राणवायू अपुरा पडत असल्याने वाढीव साठा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क साधला होता. मात्र, ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यग्र असल्याने संवाद होऊ शकला नाही. नंतर संपर्क  साधण्यात येईल, असे पंतप्रधान कार्यालयाकडून कळवण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील उद्योजकांच्या बैठकीत दिली.

प्राणवायूची राज्याला खूप गरज असून, सध्या उत्पादित होणारा सर्व प्राणवायू वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्णसंख्या पाहता आणखी प्राणवायूची गरज भासत असून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे कळविले आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला होता. मात्र ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यग्र असल्याने संवाद झाला नाही. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांशी संवाद साधताना नमूद के ले. मात्र, यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा जुंपली आहे.

मुंबईत सहा रुग्णालयांतील १६८ रुग्णांचे स्थलांतर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सहा रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा साठा संपुष्टात आल्यामुळे तेथील तब्बल १६८ करोनाबाधित रुग्णांना अन्य रुग्णालये आणि करोना केंद्रांमध्ये हलवावे लागले. पालिकेची सर्व रुग्णालये आणि करोना केंद्रांमध्ये प्राणवायूचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची कसरत सुरू आहे.

दिल्लीतही अपुरा साठा

दिल्लीत प्राणवायूची टंचाई असून, करोनास्थिती गंभीर आणि चिंताजनक असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले. दिल्लीत गेल्या २४ तासांत २४ हजार रुग्ण आढळले. ही रुग्णवाढ उच्चांकी असून, प्राणवायूबरोबरच रेमडेसिविरचा साठाही अपुरा असल्याचे केजरीवाल म्हणाले.