News Flash

रुग्णआलेख स्थिरतेकडे…

गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या घटली असली तरी मृतांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली.

मुंबई, ठाण्यात रुग्णसंख्येत घट; देशात मात्र नवा उच्चांक

मुंबई : देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत असली तरी राज्याचा रुग्णआलेख स्थिरतेकडे जात असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट नोंदविण्यात येत असून, पुणे, नागपूर आदी मोठ्या शहरांतही रुग्णवाढ स्थिर असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

सध्या राज्यातील दैनंदिन रुग्णवाढ ६० हजारांच्या आसपास आहे. गेल्या १५ दिवसांपासूच हाच कल दिसतो. फेब्रुवारीनंतर करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच इतका काळ रुग्णवाढ स्थिर असल्याचे दिसते. त्यामुळे राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठले असावे, असे संकेत मिळत आहेत.

मुंबईत गेल्या १५ दिवसांपासून रुग्णसंख्येत हळूहळू घट नोंदविण्यात येत आहे. सध्या मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढ सहा हजारांपेक्षा कमी झाली आहे. मुंबईत दुसऱ्या लाटेतील सर्वांत जास्त रुग्णसंख्या ४ एप्रिल रोजी (११,१६३) नोंदविण्यात आली होती. त्यानंतर नव्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आणि करोनामुक्तांची संख्या वाढू लागली. मात्र, गेल्या १५ दिवसांत रुग्णसंख्या घटली असली तरी मृतांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली.

गेल्या १५ दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात रोज सरासरी सहा हजारांहून अधिक करोनाबाधित आढळत होते. मात्र, आता रुग्णसंख्या पाच हजारांवर स्थिरावली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी १० ते १३ हजार करोना चाचण्या केल्या जातात. त्यात पूर्वी १५०० ते १८०० बाधित आढळून येत होते. आता ही संख्या ११०० ते १३०० वर आली आहे. जिल्ह्यात भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर आणि ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढली असली तरी त्यामध्ये बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत मात्र रुग्णसंख्या फारशी कमी झालेली नसून, तिथे आजही १८०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत.

पुण्यात मार्च महिन्यात वर्षभरातील रुग्णसंख्येचे उच्चांक मोडत दररोज नवे उच्चांक नोंद झाले. मात्र, एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या काहीशी स्थिरावण्यास सुरुवात झाली. १५ ते २१ एप्रिलदरम्यान शहरात दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारांवर राहिली, मात्र संसर्गाचा दर २३ ते २६ टक्के  दरम्यान कायम राहिला. २४ एप्रिलला शहरातील रुग्णांचा संसर्गाचा दर तब्बल १८ टक्क््यांपर्यंत खाली आलेला पाहायला मिळाला. संपूर्ण जिल्ह्यातील चित्रही एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून काहीसे दिलासादायक दिसत आहे. जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या तब्बल १२ हजारांवरून काही दिवसांपूर्वी १० हजारांवर स्थिर झाली आणि ती नऊ हजारांपर्यंत कमी झाल्याचे दिसत आहे. हे चित्र दिलासादायक आहे. मात्र, गाफील न राहता सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक असल्याचे महापालिके च्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

नागपूर जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोनास्थिती गंभीर वळणावर होती. रोज साडेतीन ते साडेपाच हजारांपर्यंत रुग्ण आढळू लागले तर जिल्ह्यात पन्नासावर मृत्यू होत होते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात रोज ५ ते ६ हजार नवे रुग्ण तर मृत्युसंख्या वाढतीच होती. तीन दिवसांपासून मात्र स्थिती सुधारत आहे. जिल्ह्यात १९ एप्रिलला ११३ तर २२ एप्रिलला ११० रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मृत्युसंख्या नव्वदहून कमी झाली आहे. २५ एप्रिलला शहरात ४६, ग्रामीण ३०, जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण ८७ मृत्यू झाले. शहरात ४ हजार ७२०, ग्रामीण ३ हजार ४०, जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण ७ हजार ७७१ रुग्ण आढळले.

राज्यात करोनाचे ६६,१९१ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या ६६,१९१ रुग्णांची नोंद झाली असून, ८३२ जणांचा मृत्यू झाला. दैनंदिन मृतांचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. राज्यात सध्या ६ लाख ९८ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे. पुण्यात मात्र १ लाख ०७ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

दिलासा असा…

मुंबई/ठाणे : मुंबई शहरात दैनंदिन रुग्णसंख्या घटू लागली असून, रविवारी ५,५४२ रुग्ण आढळले. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाणही घटले असून, ते १३.७५ टक्के आहे. दिवसभरात ६४ रुग्णांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातही रुग्णसंख्येत रविवारी मोठी घट झाली. जिल्ह्यात रविवारी ४ हजार २११ रुग्ण आढळले. ठाणे शहरात १,०४२ रुग्ण आढळले.

देशात ३,४९,६९१ नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशात करोनाचा वेगाने फैलाव होत असून, गेल्या २४ तासांत ३,४९,६९१ रुग्ण आढळले. दिवसभरात २,७६७ रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णसंख्या आणि करोनाबळींचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. गेल्या चार दिवसांपासून देशात तीन लाखांहून अधिक रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे.

दिल्लीत टाळेबंदी कालावधीत वाढ

दिल्लीतील करोनास्थिती गंभीर असून, बाधितांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे दिल्लीतील टाळेबंदी ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारने रविवारी घेतला. वाढीव टाळेबंदी अधिक कठोर असून, त्यात खासगी कार्यालये, बांधकाम, आठवडी बाजार बंद ठेवण्यात येतील. दिल्लीत गेल्या आठवडाभरात चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ३६ टक्के आढळले होते. रविवारी ते २९ टक्के आढळले असले तरी ते आणखी कमी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 2:16 am

Web Title: corona virus infection patient graphs towards instability akp 94
Next Stories
1 लशीसाठी नोंदणी बंधनकारक
2 सर्वपक्षीय नेत्यांकडून रेमडेसिविर वाटप!
3 महाराष्ट्राला ४४ टन प्राणवायू
Just Now!
X