निम्म्या पोलीस ठाण्यांत तीन पाळ्यांमध्ये काम

मुंबई : करोनाकाळात विस्कटलेली पोलिसांच्या आठ तास कर्तव्याची घडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे प्रत्येक पोलीस ठाण्याने आठ तासांच्या तीन पाळ्यांत कर्तव्याचे नियोजन करावे, अशा सूचना पोलीस आयुक्तालयाने जारी केल्या आहेत.

मुंबईत टाळेबंदी लागू होण्यापूर्वी शहरातील ८९ पोलीस ठाण्यांमध्ये आठ तास कर्तव्य म्हणजे तीन पाळ्यांमध्ये काम सुरू होते. मात्र करोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव, जारी झालेली टाळेबंदी, तोकडी पडणारी वाहतूक व्यवस्था, कडेकोट बंदोबस्ताची जबाबदारी यामुळे पोलीस ठाण्यांचे मनुष्यबळ तोकडे पडू लागले.

मुंबई पोलीस दलात कर्तव्य बजावणारे बहुतांश पोलीस कर्मचारी, अधिकारी अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, पनवेल, विरार येथे वास्तव्यास आहेत. लोकल सेवा बंद असल्याने त्यांना मुंबईच्या बाहेरून कर्तव्यावर येणे अडचणीचे बनले होते. त्यातच पोलीस ठाण्यांतील सहकारी करोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात ठेवले जात होते. करोनाचा धोका  लक्षात घेऊन ५५ वर्षांवरील पोलीस हवालदार, अमलदारांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे करोनाची लागण न झालेल्या, पोलीस ठाण्याजवळ राहाणाऱ्या किंवा नियमितपणे कर्तव्यावर येणारे अधिकारी, अंमलदारांवर कामाचा प्रचंड ताण पडत होता. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांच्या कर्तव्याच्या काळात फेरबदल करण्यात आले. बदलांनुसार १२ तास कर्तव्य आणि २४ तास आराम, अशी नवी पद्धत सुरू करण्यात आली.

नऊ  महिन्यांनंतर टाळेबंदी टप्प्याटप्याने शिथिल झाली. पोलीस दलातील करोना प्रादुर्भावही बऱ्याच अंशी कमी झाला. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने पोलीस ठाण्यात आठ तास कर्तव्य सुरू करावे, अशी सूचना आयुक्तालयाने जारी केली आहे. त्यानुसार शहरातील ५० हून अधिक पोलीस ठाण्यांमध्ये तीन पाळ्यांमध्ये काम सुरू झाले आहे. शहरातील १३ उपायुक्तांनी आपल्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यांना तशा सूचना दिल्या आहेत.

आठ तास कर्तव्य योजना काय?

तत्कालीन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पोलीस दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदांवरील मनुष्यबळाकरता ‘आठ तास कर्तव्य’ ही योजना सुरू केली. मे २०१६ मध्ये देवनार पोलीस ठाण्यात प्रयोग सुरू झाला. सण-उत्सव, निवडणुका, आंदोलने आदी परिस्थित तो यशस्वी ठरल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही योजना शहरातील ९३ पोलीस ठाण्यांत राबविण्यात आली. यापूर्वी एका पाळीतील काम संपवून पोलीस ठाण्याबाहेर पडताना अनेकदा १५ ते १८ तास काम करावे लागत होते. अतिरिक्त कामाचा मोबदलाही तुटपुंजा होता. शिवाय कुटुंब, स्वत:चे छंद जोपासण्यास पोलिसांना वेळ मिळत नव्हता. त्यामुळे पोलीस कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होत होता. अवेळी खाणे, अपुऱ्या झोपेमुळे पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला, पोलिसांमधील व्यसनाधिनता वाढली, पोलीस ठाण्यात अनुपस्थित राहण्याचे प्रमाणही वाढले. मात्र आठ तास कर्तव्य सुरू झाल्यानंतर काही अंशी या अडचणी कमी झाल्या. शिवाय कामातील अचुकताही वाढली, असे निरीक्षण या योजनेच्या आढाव्यानिमित्त वेळोवेळी नोंदवण्यात आले आहे.

आठ तास कर्तव्य हा विषय उपलब्ध मनुष्यबळावर अवलंबून आहे. पुरेसे मनुष्यबळ असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये आठ तासांप्रमाणे तीन पाळ्यांमध्ये कर्तव्य सुरू होऊ  शकते. मात्र हा निर्णय संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांवर अवलंबून असेल. – एस. चैतन्य, पोलीस प्रवक्ते