पहिल्या दिवशी प्रतिसाद बेताचाच

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर उपाहारगृहे सोमवारी सुरू झाल्यानंतर खवय्यांनी उपाहारगृहे गाठली. एरव्हीपेक्षा गर्दी कमी असली तरी दक्षिण मुंबईतील पंचम पुरिवाला, फोर्ट भागातील पौर्णिमा, हरीश या उपाहारगृहात बसून खाण्याचा आस्वाद खवय्यांनी घेतला. मात्र उपाहारगृहांना मिळणारा एकूण प्रतिसाद बेताचाच असल्याचे दिसले.

करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यावर एप्रिल महिन्यात उपाहारगृहात बसून खाण्यास बंदी घालण्यात आली. केवळ पदार्थ बांधून देण्याची परवानगी देण्यात आली होती. आता उपाहारगृहे सायंकाळी ४ पर्यंत बैठक व्यवस्थेसह सुरू ठेवण्याची परवानगी महापालिकेने दिल्याने जवळपास दोन महिन्यांनी सोमवारी उपाहारगृहाचे दार पूर्ण उघडले. सोमवारी एरव्हीपेक्षा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होता. बाजारपेठांच्या ठिकाणी असलेल्या उपाहारगृहांमध्येही मात्र काही प्रमाणात ग्राहक येत होते. मात्र काहींनी उपाहारगृहे सुरू होताच जिभेचे चोचले पुरवण्यास सुरुवात केली. ‘बरेसचे ग्राहक आवर्जून खाद्यपदार्थ खाण्यासाठी आले होते. बऱ्याच काळाने निवांत बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार असल्याने हे ग्राहक समाधान व्यक्त करत होते,’ असे हुतात्मा चौक परिसरातील पौर्णिमा उपाहारगृहातील कर्मचाऱ्याने सांगितले.

दादर परिसरातील बहुतांश उपाहारगृहे बंद

‘कर्मचाऱ्यांअभावी आणि केवळ सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या उपाहारगृहे सुरू ठेवण्याच्या बंधनामुळे दादर भागातील बहुतांश मालकांनी उपाहारगृहे सुरू केली नाहीत. उपाहारगृहे   सुरू करण्यासाठी सध्या पुरेसे मनुष्यबळ नाही. बहुतांश कर्मचारी गावी गेले आहेत. सध्या त्यांच्या गावात कडक निर्बंध आहेत. तेथून त्यांना मुंबईत पोहोचण्यासाठी काही दिवस जातील. त्यानंतर हे कर्मचारी आल्यावर पुढील आठवड्यात उपाहारगृहे सुरू होईल,’ असे दादर येथील तृप्ती उपाहारगृहाचे मालक राजेंद्र भागवत यांनी सांगितले. तर ‘सध्या उपाहारगृहे सुरू केले तर सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे लागेल. मात्र चारनंतर पुन्हा त्यांना माघारी पाठवावे लागेल. केवळ चार तासांसाठी कर्मचाऱ्यांना बोलाविणे परवडणारे नाही. त्यामुळे सध्या फक्त पार्सल सेवाच सुरू ठेवणार आहे,’ असे प्रकाश उपाहारगृहाचे आशुतोष जोगळेकर यांनी सांगितले.

व्यवसाय पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार

‘बाजारपेठांमध्ये सकाळच्या वेळात गर्दी झाली तरी लोक खाऊन घराबाहेर पडले होते. त्यामुळे नाश्त्याचे पदार्थ विकलेच गेले नाही. दुपारच्या वेळेतही किरकोळ ग्राहक मिळाल्याने बैठक व्यवस्था सुरू करूनही उपयोग झाला नाही, असे मत हॉटेलचालकांनी व्यक्त केले. ‘सध्या कार्यालये बंद आहेत. लोकही आवश्यकता असेल तरच बाहेर पडत आहेत. त्यामुळे उपाहारगृहांमध्ये जेवण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. कुटुंबासोबत जेवायला येणारे रात्रीच्या वेळेतच येतात. त्यामुळे बैठक व्यवस्थेला किमान रात्री ११ पर्यंतची परवानगी मिळत नाही तोवर व्यवसाय रुळावर येणे कठीण आहे,’ असे शीव येथील कॅफे वृंदावनचे सदशिव पुजारी यांनी सांगितले.

भीती अद्याप कायम

ग्राहकांमधील करोनाची भीती गेलेली नाही. त्यामुळे उपाहारगृहात बसून खाण्यासाठी अजून ग्राहक घाबरत आहेत. मात्र इतक्या दिवसांनी उपाहारगृहे सुरू झाल्यावर पहिल्या दिवशी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे, असे सीएसएमटी स्थानकासमोरील पंचम पुरिवाला उपाहारगृहाचे मालक संदीप शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, उपाहारगृहे सुरू झाल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून दुपारच्या जेवणासाठी करावी लागणारा धावाधाव काहीशी कमी झाली आहे.

 

बैठक व्यवस्था सुरू झाली असली तरी त्याला फारसा प्रतिसाद नाही. असेच चित्र सुरू राहिले तर व्यवसायात केवळ खर्च वाढतील पण उत्पन्न मिळणार नाही. सायकांळी ४ पर्यंतच्या मर्यादेमुळे ८० टक्के नुकसान कायमच राहाणार आहे. उपाहारगृहांचा सर्वाधिक व्यवसाय हा रात्रीच्या वेळेत आणि सुट्ट्यांच्या दिवशी होतो. त्यामुळे  सुट्ट्यांच्या दिवसांसह इतर दिवशीही रात्री ११ पर्यंत उपाहारगृहे सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. – प्रदीप शेट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष- हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया