पहिल्याच दिवशी खरेदीसाठी गर्दी; फेरीवाल्यांमुळे रस्ते गजबजले

मुंबई : महापालिकेने निर्बंध शिथिल करताच ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा गजबजल्या. मुंबईतील ठिकठिकाणच्या बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या होत्या. तब्बल दोन महिन्यांनी खरेदीसाठी बाहेर पडल्याने लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ग्राहकांनी दुकाने तर फेरीवाल्यांमुळे रस्ते गजबजलेले होते.

राज्य सरकारने जिल्हानिहाय निर्बंध शिथिल करण्याची परवानगी दिल्यानंतर मुंबईत पालिकेने सायंकाळी चार वाजेपर्यंत सर्व दुकाने, उपाहारगृहे सुरू ठेवण्याची परवानगी दिली. बऱ्याच दिवसांनी दीर्घकाळ बाजारपेठा खुल्या राहणार असल्याने पहिल्याच दिवशी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले. स्थानिक बाजारपेठांसह दादर, हिंदमाता, भायखळा, मशीद बंदर अशा मोठ्या बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. दादर बाजारपेठेत दुकानांसह फेरीवाल्यांनी पदपथ गजबजले होते. कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, शोभेच्या वस्तू आणि नाना गोष्टींची मनसोक्त खरेदी महिला वर्गाकडून होत होती. मुखपट्टीचा वापर सक्तीने होताना दिसला.

गर्दी कुठे? 

बाजारपेठांमध्ये उत्साह असला तरी ठरावीक दुकानांमध्ये विशेष लगबग पाहायला मिळाली. कपडे, साड्या, प्लास्टिक वस्तू, भांडी, देवपूजेचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पावसाळी वस्तू यांच्या दुकानांना विशेष प्रतिसाद होता. पावसाच्या सरी बरसू लागल्याने छत्री, रेनकोट खरेदी करणारा मोठा वर्ग बाजारपेठेत दिसून आला. भांड्यांची आणि प्लास्टिक वस्तूंची दुकानेही आणि ठेल्यांवरही गर्दी होती. याशिवाय कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहक आवर्जून जात होते. सध्या निर्बंधकाळ असला तरी लग्नसोहळे होत असल्याने हिंदमाता येथील बऱ्याच साडीच्या दुकानांमध्ये बस्ता बांधण्याची लगबग पहिल्याच दिवसापासून सुरू झाल्याचे दिसले.