‘समस्त महाजन’ संस्थेच्या भोजनरथाची लाखो नागरिकांना मदत

मुंबई : विषाणू कहराच्या पहिल्या टप्प्यात अन्नदानाच्या माध्यमातून लाखो लोकांचे पोट भरणारी ‘समस्त महाजन संस्था’ आजही दिवसाला ३०० ते १८०० लोकांना मोफत जेवण देत आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या दहिसर ते जोगेश्वरी भागांत विलगीकरणात असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना घरपोच जेवण देण्याचे काम या संस्थेने काही कालावधीत केले. त्यासह मुंबईभर ‘भोजनरथ’ आणि ‘अन्नधान्य वाटप’ यांच्या माध्यमातून ही संस्था हजारो गरजूंना मदतीचा हात देत आहे.

करोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. हातावर पोट असणारे, मजुरीवर काम करणारे, ठेले लावणारे, रस्त्यारस्त्यांवर उभे राहून नाना वस्तू विकणारे पुरते हवालदिल झाले. सिग्नलनजीक मागून खाणारे, तृतीयपंथी यांची तर अवस्था अधिकच बिकट बनली. केवळ एक वेळच अन्न शिजवून खाणारे कित्येक लोक आज मुंबईत आहेत. या सर्वांना मदत करण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला.

एप्रिल २०२१ मध्ये रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली. त्या वेळी गृहविलगीकरणात असलेल्या करोनाबाधित रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाचे हाल होत असल्याचे निदर्शनास येताच या संस्थेने तातडीने योजना आखत त्यांना घरपोच जेवण देण्यासाठी यंत्रणा उभारली. पहिल्या टप्प्यात दहिसरपासून सुरू केलेली ही सेवा पुढे जोगेश्वरीपर्यंत विस्तारली. ज्यांना जेवणाची निकडीची गरज असेल अशांसाठी समाजमाध्यमांवर पत्रक फिरवण्यात आले. त्यानंतर दिवसभरात शेकडो लोकांची मदतीसाठी विचारणा होऊ  लागली. करोनाबाधित रुग्णांना अशक्तपणामुळे जेवण बनवणे शक्य नसल्याने अशा कुटुंबासाठीही या संस्थेने अन्नआधार दिला. बाधित रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबाला सकस आणि परिपूर्ण अन्न देण्याच्या उद्देशाने ही संस्था काम करीत असल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्नदानापलीकडे...

अन्नदानाच्या खर्चाचा सर्व वाटा ‘समस्त महाजन संस्था’ स्वत: उचलते. परंतु अनेक दानशुरांचे हात या संस्थेशी जोडले गेले असल्याने संस्थेलाही मदतीचा ओघ तितकाच आहे. त्यामुळे केवळ अन्नदान करून संस्थेने कार्य थांबवले नाही तर गरजूंना अंदाजे ८०० रुपये किमतीचा वाणसामानाचा संचही दिला जात आहे. दिवसाला २५ ते ७५ लोकांना रोज असे संच दिले जात आहेत. मुंबईतल्या तृतीयपंथीयांनादेखील संस्थेने मदतीचा हात दिला.

बाधितांना घरपोच जेवण

एप्रिल आणि मे अशी जवळपास सव्वा महिना ही सेवा संस्थेने सुरू ठेवली. या कालावधीत १० हजार लोकांना घरपोच जेवण देण्यात आले. यामध्ये वृद्ध, विद्यार्थीवर्ग यांचाही समावेश आहे. कित्येक घरातील महिला बाधित झाल्याने मुलांना बाहेरच्या जेवणावर अवलंबून राहावे लागत होते, अशांनाही संस्थेने घरपोच जेवण दिले. बऱ्याच ठिकाणी उपाहारगृहे, खानावळी बाधित रुग्णांना घरपोच सेवा देण्यास नकार देत होत्या. त्या दृष्टीने सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊनबाधितांपर्यंत ही संस्था भोजन घेऊन पोहोचत होती.

 

आहाराची सकसता

‘चपाती, दोन भाज्या, भात आणि एक गोड पदार्थ असा सकस आहार आम्ही बाधित रुग्णांना पुरवत होतो. किंबहुना हाच आहार भोजनरथातही पाठवला जातो. गेल्या १०० दिवसांत जवळपास ७५ हजारांहून अधिक लोकांनी या भोजनाचा लाभ घेतला आहे. त्यासाठी बोरीवली येथे १० ते १२ लोक दिवसरात्र जेवण बनवण्यासाठी मेहनत घेत आहेत. काही लोक आम्हाला संपर्क करून अमुक एका विभागात गरजूंची संख्या जास्त असल्याचे सांगतात, तेव्हा तातडीने तिथे जेवण पाठवले जाते,’ असे समस्त महाजन संस्थेचे सदस्य परेश शहा यांनी सांगितले.

सलग १०० दिवस…

’गेले १०० दिवस ‘भोजनरथ’ ही संकल्पना संस्थेद्वारे राबविली गेली. बोरीवलीमधून जेवणाची मोठाली पातेली घेऊन हा भोजनरथ रोज मुंबईतल्या एका विभागात जातो.

’कुलाब्यापासून ते विरार, पनवेलपर्यंत सबंध मुंबईत हा रथ अविरत फिरतो. दिवसाला ३०० ते १८०० लोकांना मोफत जेवण त्याद्वारे दिले जाते.