नगर, नाशिक आणि पालघरमध्ये चिंता

मुंबई : राज्यात बाधितांच्या प्रमाणात काहीशी वाढ झाली असून प्रमाण २.६० टक्क्यांवर गेले आहे. यात प्रामुख्याने नगर, नाशिक आणि पालघरमध्ये बाधितांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बाधितांचे प्रमाण सुमारे २.४० टक्के होते. परंतु सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चाचण्यांची संख्या कमी झाली असली तरी मात्र बाधितांचे प्रमाण हे २.६० टक्क्यांच्याही वर गेले आहे.

पुण्यात बाधितांच्या प्रमाणात घट झाली असली तरी अजूनही हे प्रमाण ५.८२ टक्के आहे. अहमदनगरमध्ये मात्र पाच टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर गेले आहे. नाशिकमध्ये वाढ झाली असून २.८० टक्क्यांवरून थेट ३.८६ टक्क्यांवर गेले आहे. सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद येथे बाधितांच्या प्रमाणात घट झाली आहे. परंतु पालघरमध्ये मात्र गेल्या दहा दिवसांत तीन टक्क्यांच्या वर गेले आहे.

चाचण्यांमध्ये घट

ऑगस्टमध्ये राज्यात दररोज दोन ते अडीच लाख चाचण्या केल्या जात होत्या. परंतु सप्टेंबरपासून हे प्रमाण दीड ते पावणे दोन लाखांपर्यंत घसरले आहे. गणेशोत्सवाच्या काळात तर आणखी घट होऊन १ लाख ४० हजारांपेक्षाही कमी चाचण्या केल्या गेल्या. परिणामी दैनंदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही सुमारे तीन ते साडे तीन हजारांपेक्षाही कमी झाली आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या ही मागील दहा दिवसांत १४ टक्क्यांनी वाढली असून सध्या २४ हजार १९७ रुग्ण उपचार घेत आहेत. यात अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सर्वसाधारण विभागात प्राणवायूवर असेल्या रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे.