|| रसिका मुळ्ये

नववीतील मुलांच्या नोंदणीतून बाब उघड; करोनाचा शिक्षणावरील परिणाम

मुंबई : करोना प्रादुर्भावामुळे उद्योग-नोकऱ्यांवर झालेल्या दुष्परिणामांतून कित्येक नागरिकांचे शहरगावातून विस्थापन झाले. मोठी स्थलांतरे झाली. या सर्वांमुळे नवे सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न निर्माण झाले असून गेल्या वर्षी नववीतून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्याची संख्या अडीच लाखांहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यातील शाळाबाह्य किंवा सद्य:स्थितीत संपर्क क्षेत्रात नसलेल्या बालकांची नोंद शिक्षण विभागाने केली. पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. मात्र त्यापुढील म्हणजेच १४ वर्षांपुढील मुलांच्या परिस्थितीची गणती फारशी झालेली नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी नववी झालेली मुले दहावीत जाताना यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे समोर आले. गेल्या वर्षी (२०१९-२०) नववीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत साधारण अडीच लाखांची तफावत आहे. म्हणजेच इतक्या संख्येने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले.

झाले काय?

यंदा दरवर्षीपेक्षा दहावीच्या परीक्षेला नोंदणी काहीशी अधिक झाली असली तरी या माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यावर साधारण अडीच लाख विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेल्याचे समोर आले. म्हणजेच करोनाच्या कारणांमुळे झालेले स्थलांतर, शहर-गाव यांतील बदलांमुळे नववीनंतरच अडीच लाख विद्यार्थ्यांची शाळा सुटली. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे.

कारणे काय?

’ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता न आल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला.

’करोना काळात भीतीमुळे शहरांतून गावात किंवा एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांमुळे अनेक विद्यार्थ्यांची शाळा आपोआप सुटली.

’ग्रामीण भागात भविष्याविषयी चिंतेतून बालविवाहाची वाईट प्रथा फोफावली. त्यातून अनेक मुलींचे शिक्षण नववीनंतर कुटुंबीयांनीच थांबविले, त्यामुळे हा परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

एक लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण…

गेल्या वर्षी नववीच्या अंतिम परीक्षा झाल्या नाहीत. दोन चाचणी आणि सहामाही परीक्षेच्या सरासरी मूल्यांकनाच्या आधारे अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राज्यातील २४ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर ७४ हजार विद्यार्थ्यांचा निकाल सरल प्रणालीवर नोंदवण्यात आला नाही. गेल्या वर्षी नववीच्या वर्गात कुणालाही अनुत्तीर्ण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र विद्यार्थी संपर्कात नसल्याने किंवा एकही परीक्षा न दिल्याने विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले असू शकतात.

आकडेवारी काय सांगते? गेल्या वर्षी १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांनी नववीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यातील १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा अर्ज भरणे अपेक्षित होते. मात्र यंदा दहावीच्या परीक्षेसाठी आलेले एकूण अर्ज १६ लाख ५७ हजार ७९ आहेत. त्यातील साधारण ५६ हजार पुनर्परीक्षार्थी आहेत. म्हणजेच साधारण १६ लाख नियमित विद्यार्थी आहेत. यानुसार ३ लाख विद्यार्थी नियमित शिक्षणप्रवाहात टिकू शकलेले नाहीत.