नियमांना हरताळ फासत लोकप्रतिनिधी, अधिकारी, सेलिब्रिटींची उपस्थिती

मुंबई : संचारबंदीचे आदेश असताना मुंबई आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. युद्धपातळीवर राज्य आणि केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. घरी बसा बाहेर पडू नका, असे आवाहन पंतप्रधान- मुख्यमंत्र्यांपासून सगळेच राजकीय नेते करत आहेत. परंतु गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी, पालिका अधिकारी, समाजातील मान्यवर मंडळींकडून या नियमांना उल्लंघन हरताळ फासत असल्याचे चित्र शुक्रवारी बोरिवली पश्चिम येथील पंजाब लेन परिसरातील करोना चाचणी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पाहायला मिळाले.

खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पुढाकारातून हे केंद्र सुरू करण्यात आले असून केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांच्यासह आमदार विलास पोतनीस, नगरसेवक प्रवीण शहा, बीना  दोशी, संध्या दोशी, आर सेंट्रल प्रभागाच्या अध्यक्ष शीतल म्हात्रे पालिकेचे उपायुक्त शंकरवार, अभिनेते शरद पोंक्षे, अविनाश नारकर यांच्यासह परिसरातील मान्यवर, वैद्यकीय अधिकारी या करोना चाचणी केंद्राच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली होती.

या उद्घाटनाच्या वेळी डॉक्टरही तेथे उपस्थित होते. सगळ्यांनी चेहऱ्यावर मास्क परिधान केले होते. मात्र दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर ठेवण्यात आले नव्हते. शिवाय जमाव करू नका, गर्दी टाळा असे आवाहन वारंवार केले जात आहे. असे असतानाही या करोना चाचणी केंद्राच्या उद्घाटनासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गर्दी करण्याची गरज काय, केंद्राच्या उद्घाटनाचा एवढा मोठा गाजावाजा कशासाठी, असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. बोरिवलीत असे केंद्र सुरू करणे ही निश्चितच चांगली बाब आहे. लोकांना चाचणीसाठी नेमके कुठे जायचे, हा प्रश्न भेडसावणार नाही. परंतु लोकप्रतिनिधी आणि समाजातील जबाबदार मंडळींकडूनच जर सरकारने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन केले जाणार नसेल, संचारबंदी असतानाही गाजावाजा करत, गर्दी गोळा करत अशाप्रकारे उद्घाटन सोहळे आयोजित केले जात असतील तर सर्वसामान्यांनी त्यांच्याकडून काय बोध घ्यावा, अशी चर्चाही परिसरात होती.  बोरिवली मेडिकल ब्रदरवूडचे अध्यक्ष डॉ. निमेश मेहता, डॉ. बिपीन दोशी आणि के व्ही ओ मानव कल्याण केंद्र, नवनीत रुग्णालयाचे अध्यक्ष नेमजीबाई गांगर यांच्याकडून हे करोना चाचणी केंद्र चालवण्यात येणार आहे. पोईसर जिमखाना व कपोल समाज महावीरनगर डहाणूकर वाडी संघाने या केंद्रातील वैद्यकीय उपकरणांसाठी निधी उपलब्ध केला.

आरोपांचे खंडन

हे केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गोपाळ शेट्टी यांनी मात्र या सगळ्या आरोपांचे खंडन केलेले आहे. पालिकेची रीतसर परवानगी घेऊन हे करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी २० डॉक्टर आपल्यासोबत होते. शिवाय उपस्थितांनी एकमेकांमध्ये विशिष्ट अंतर ठेवले होते. केंद्र आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी करण्यात आले. अशा संकटसमयी लोकप्रतिनिधींनी लोकांसाठी पुढे यायचे नाही, तर लोकांनी कुणाकडे पाहायचे, असा सवालही शेट्टी यांनी केला. निदान आताच्या घडीला तरी राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येऊन या संकटाला सामोरे जायला, असे आवाहन शेट्टी यांनी केले.