रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी झाल्याने खासगी बसच्या प्रवासभाड्यात वाढ

मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईतून गावी परतणाऱ्या प्रवाशांचा ओघ वाढला असून उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने भरून जाताना दिसत आहेत. जागा आरक्षित के लेल्या प्रवाशांनाच रेल्वेतून प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या खासगी बस गाड्यांना मागणी वाढली असून उत्तर भारतातील काही राज्यांत जाणाऱ्या बस गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाली आहे.

नव्याने लागू झालेल्या कठोर निर्बंधांमुळे परराज्यांतील कामगारांनी पुन्हा एकदा परतीचा प्रवास सुरू केला आहे. सध्या रेल्वेमधून मर्यादित प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा आहे. आरक्षित जागेव्यतिरिक्त अतिरिक्त प्रवाशांना रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे आता खासगी बस गाड्यांना मागणी वाढली आहे. खासगी वाहतूकदारांनी तिकिटांचे दरही वाढवण्यास सुरुवात केली आहे.

राजस्थान आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडे विचारणा होताना दिसत आहे. ‘सध्या राजस्थानातील उदयपूरनजीकच्या गावाकडे जाण्यासाठी मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. यामध्ये मजुरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे उदयपूरचे तिकीट दर सध्या १००० रुपयांवरून १५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत,’ अशी माहिती फाल्कन बसचे हार्दिक कोटक यांनी दिली.

‘सध्या प्रवासी कामगार गावाकडे जाण्याची सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळेही अनेक जण गावी परत निघाले आहेत. उत्तर प्रदेशात जाणाऱ्या बस गाड्यांची संख्या वाढली आहे. गेल्या १० दिवसांत मुंबईतून १०० खासगी बस गाड्या प्रवाशांना घेऊन उत्तर प्रदेशला गेल्या आहेत. दरदिवशी ९ ते १० गाड्या उत्तर प्रदेशात प्रवासी घेऊन जात आहेत. तसेच गावी जाणाऱ्यांकडून बसचे आरक्षण उपलब्ध आहे का याची विचारणा होत आहे,’ असेही कोटक यांनी सांगितले.

गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी बंधनकारक केल्याने त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींना समोरे जावे लागत आहे. गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना त्यासाठी राजस्थानमध्ये जाऊन तेथून गुजरातमध्ये जाण्याचा मार्गही काही प्रवाशांनी निवडला आहे.

दरम्यान, एलटीटी रेल्वे स्थानकात जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढत आहे. मुंबईतून उत्तर भारतात सुटणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या भरून जाताना दिसत आहेत. दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्या ६० ते ७० टक्के प्रवासी क्षमतेने धावत आहेत. राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यामुळे रोजगाराची अनिश्चितता दिसू लागल्याने मजुरांकडून रेल्वे तिकीट मिळू शकेल का, अशी विचारणा होत आहे, अशी माहिती आजिविका ब्युरोचे दीपक पराडकर यांनी दिली.

पाच विशेष रेल्वेगाड्या

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने या ठिकाणी जाण्यासाठी पाच नवीन विशेष गाड्यांची घोषणा मध्य रेल्वेने के ली असून यामध्ये मुंबई-गोरखपूर स्पेशल, पुणे-दानापूर, मुंबई-पटना, मुंबई-गोरखपूर विशेष, मुंबई-दरभंगा अतिजलद विशेष या पाच गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, करोनानंतर कमी के लेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत करण्यासाठी दर महिन्याला रेल्वेकडून काही नवीन गाड्या सुरू के ल्या जात आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.