मुंबई : टाळेबंदी शिथिलीकरणात अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवण्यात आले असले तरीही अद्याप मुंबईतील ग्रंथालये मात्र उघडलेली नाहीत. सार्वजनिक ठिकाणांमध्ये गणना होत असल्याने ग्रंथालये सकाळी ५ ते ९ या वेळेत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र ग्रंथालये सकाळी ९ वाजता की रात्री ९ वाजता बंद करावीत याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबई शहर जिल्ह्याच्या ‘जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालया’ने काढलेल्या पत्रकानुसार ग्रंथालय उघडण्यास सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सोमवारी परवानगी देण्यात आली. ‘भल्या सकाळी ग्रंथालयात वाचक येत नाही. शिवाय कर्मचारीही कल्याण, डोंबिवली, बदलापूरवरून येतात. त्यामुळे १५ जूनपर्यंत सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत ग्रंथालय सुरू के ले जाईल. त्यानंतर सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत ग्रंथालय सुरू ठेवले जाईल’, अशी माहिती ‘दादर सार्वजनिक वाचनालया’चे कोषाध्यक्ष मनोहर साळवी यांनी दिली. परंतु, परिपत्रकात मंगळवारी बदल करण्यात आला असून त्यानुसार ग्रंथालये सकाळी ९ वाजेपर्यंतच उघडतील, असे मुंबई शहराचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श. का. काकड यांनी सांगितले.

‘माहीम सार्वजनिक वाचनालया’नेही सकाळी ८.३० ते  दुपारी ३.३० पर्यंत वेळ ठरवली होती. परंतु, आता याबाबत पुनर्विचार करावा लागेल, असे वाचनालयाचे संदीप पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनीही ग्रंथालये सकाळी ५ ते सकाळी ९ या वेळेतच उघडतील असे सांगितले. अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झाली नसल्याचे ‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या बोरिवली शाखेच्या अध्यक्ष उमा नाबर यांचे म्हणणे आहे. ही शाखा ‘प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहा’त असल्याने त्यांची परवानगी मिळाल्याशिवाय ग्रंथालय उघडता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.